पुणे – वीज कर्मचाऱ्यांची कोणतीही “मेगाकपात’ नाही

राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती


कामगार संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

पुणे – महावितरणसह अन्य वीजकंपन्यांची फेररचना करताना कोणत्याही पदांची कपात न करता ही पदे कायम ठेवण्याचा आणि त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासन आणि वीजकंपन्या प्रशासनांनी घेतला आहे. यासंदर्भात कामगार संघटनांचे काही गैरसमज असून त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर निश्‍चितपणे तोडगा काढण्यात येईल, असा शब्दही प्रशासन आणि राज्य शासनाने दिला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्‍नावरील वाद निकाली निघण्याची शक्‍यता आहे.

आर्थिक ताण कमी करण्यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीजकंपन्यांची फेररचना करण्याचा निर्णय राज्य शासन आणि वीजकंपन्यांच्या प्रशासनांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कामगारांची मेगाकपात होईल, असा दावा तिन्ही वीजकंपन्यांतील कामगार संघटनांनी केला होता. हा प्रस्ताव मागे घ्यावा, यासाठी या कामगार संघटना दोन दिवस संपावरही गेल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता “प्रभात’ शी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.

“सध्याची वीजटंचाई लक्षात घेता राज्यातील वीज क्षेत्रापुढे अपांरपारिक उर्जेची निर्मिती करणे आणि आहे त्या संचातील वीजनिर्मितीच्या क्षमतेत वाढ निर्माण करणे ही मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे प्रसंगी धाडसाचे निर्णय घ्यावेच लागणार आहेत. मात्र, हे निर्णय घेताना त्यामुळे ग्राहक अथवा कामगारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याला प्राधान्य देण्यात येणार आहे,’ असे बावनकुळे म्हणाले. शिवाय “गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण वाढले असून त्यामुळे नागरीकरणही वाढले आहे. त्यामुळे वीजेच्या मागणीत आपोआपच वाढ झाली आहे. तरीही, या मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षाही अधिक यश आले आहे, तरीही या वीजनिर्मितीची क्षमता आणखी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी कामगार संघटनांनाही सोबत घेण्यात येणार आहे,’ असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

ही आव्हाने पेलण्यासाठी प्रयत्न करणार…!
– वीजहानी आणि गळती कमी करणार
– इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी सुविधा उभारणे
– 10 हजार मेगावॅट क्षमतेचे महापारेषणचे जाळे उभारणे
– महावितरणची जुनी यंत्रणा सक्षम करणे
– अपघातांचे प्रमाण शुन्यावर आणणे
– शेतीपंप सौर उर्जेवर आणणे
– वीजनिर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी जुने संच बदलणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)