पुणे – विस्तार हवा; तर मग खर्चाची जबाबदारी घ्या

बिज्रेश दीक्षित : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी 2 पर्याय

पुणे – स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासह शहरातील काही भागांत मेट्रो विस्तार करण्याची मागणी महापालिकेने केली आहे. या मार्गांचा विस्तार हवा असल्यास पालिकेने मेट्रो प्रकल्पाच्या खर्चातील राज्य शासनाच्या 20 टक्‍के हिश्‍श्‍यांची जबाबदारी घ्यावी अथवा राज्य शासनाकडून हा खर्च मंजूर करून द्यावा, अशी भूमिका महामेट्रोने घेतली आहे. त्यामुळे भविष्यात विस्तार करायचा झाल्यास हे काम महामेट्रो करेल मात्र, निधी महापालिकेने दिला तरच हा विस्तार केला जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी 2 पर्याय निश्‍चित केले असून त्याचे सादरीकरण लवकरच महापालिकेस केले जाणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

-Ads-

दीक्षित म्हणाले, महामेट्रोने स्वारगेट ते कात्रज विस्तारीकरणाचा अंतिम आराखडा तयार केला असून या प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येईल हे निश्‍चित केले जात आहे. त्यात स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भुयारी केल्यास तो सुमारे 5.6 किलो मीटरचा असणार असून त्यासाठी 3,600 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर हा मार्ग भुयारी न केल्यास दुसरा पर्यायी मार्ग सुमारे 8 किलो मीटरचा असून त्याला 2 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पुणे मेट्रोला मान्यता देताना, कर्जाच्या स्वरुपात 50 टक्‍के भांडवल तर केंद्र व राज्य शासन प्रत्येकी 20 टक्‍के आणि 10 टक्‍के हिस्सा निश्‍चित केला आहे. मात्र, राज्य शासनाकडून केवळ स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गांसाठी आपला हिस्सा दिला जाणार आहे. त्यामुळे या विस्तारासाठी शासन निधी देणार नाही. परिणामी ही निधीची जबाबदारी पालिकेची आहे. अथवा शासनाकडे निधीची मागणी करावी तरच या मार्गाचे विस्तारीकरण करणे शक्‍य होणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. तसेच, या अंतिम करण्यात आलेल्या आराखड्याचे सादीकरण महापालिकेस केले जाणार असून त्यात त्यांना या निधीबाबत स्पष्ट सूचना देण्यात येणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर जबाबदारी घ्यावी
पिंपरी-चिंचवड ते निगडी या मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यात शासनाच्या 20 टक्‍के खर्चाची जबाबदारी पालिकेने घेतली असून 20 टक्‍के केंद्र शासन तर 60 टक्‍के खर्च कर्ज उभारणी तसेच इतर पर्यायांद्वारे महामेट्रो उचलणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेनेही याच धर्तीवर आपल्या विस्तारीत मार्गांसाठी निधी द्यावा, अशी मागणी महापालिकेकडे केली जाणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने नुकतेच पिंपरी-चिंचवड ते निगडी या मार्गाच्या विस्तारीकरणास मान्याता दिली आहे. मात्र, शासनाने केवळ मान्यता दिली असून या मार्गाचा राज्य शासनाचा हिस्सा महापालिकाच देणार आहे. त्याच, धर्तीवर पुणे महापालिकेने निर्णय घेतल्यास विस्तारीकरण करणे शक्‍य होईल.
– ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)