पुणे – वृक्षतोड परवानगी अधिकार पालिकेकडे नकोच

वृक्षप्रेमींची मागणी : वृक्ष प्राधिकरण समितीविरोधात तक्रारी वाढल्या

पुणे – शहरातील वृक्षतोडीबाबत महापालिकेला गांभीर्य नाही. वृक्षतोडीच्या हरकतींवर सुनावणी न घेताच परवानगी देणे, प्रत्यक्ष पाहणी न करणे, वृक्ष समितीवर तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक न करणे अशा तक्रारी सातत्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीविरोधात सांगितल्या जात आहेत. त्यामुळेच शहरातील वृक्ष तोडीच्या परवानगीचे अधिकार महापालिकेकडून काढून वनविभागाकडे देण्यात यावे, तसेच उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानेच वृक्षतोडीची परवानगी द्यावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

शहरात होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीबाबत महापालिकेला कोणतेही गांभीर्य नाही. वृक्षतोडीची परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे आहेत. मात्र,या समितीत आवश्‍यक सभासदांची नेमणूकच करण्यात आलेली नाही. वनस्पतींचा अभ्यास असणारे तज्ज्ञ अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीदेखील समितीत नेमण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर वृक्षतोडीची सुनावणीदेखील वेळेवर न करता त्यासाठी टाळाटाळ केली जाते, असे एकाहून एक आरोप महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती आणि एकूणच वृक्षविषयक धोरणाबाबत केले जात आहेत.

याबाबत हाय लाइट फोरमचे उमेश नाईक म्हणाले, “शुक्रवारपेठेतील वाडिया हॉस्पिटल परिसरातील 96 झाडांच्या तोडीस मी आक्षेप नोंदविला होता. मात्र, त्यावर कोणतीही सुनावणी घेण्यात आली नाही. तसेच माझ्यासोबत वृक्षतोडीची पाहणी करणे कायद्याने बंधनकारक असतानाही अशी कोणतीही प्रक्रिया यावेळी केली गेली नाही. याऊलट वृक्षतोडीला थेट परवानगी देण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्‍त आणि संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे.’

अशाप्रकारचे शहरातील इतरही नागरिकांकडून वृक्षतोडीच्या सुनावणीबाबत तक्रारी केल्या जातात. तर तज्ज्ञ अधिकारी, सदस्य नसलेल्या प्राधिकरणाकडून परवानगीचे अधिकार काढून टाकण्याची मागणी शहरातील काही वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती आहे कुठे?
महापालिकेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांबाबत नागरिकांना माहितीच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर महपालिकेच्या संकेस्तस्थळावर देखील यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नाही. वृक्षप्राधिकरण समितीचा अधिभार ज्यांच्याकडे आहेत ते महापालिका अधिकारी गणेश सोनुने हे कधीच उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)