पुणे – उन्हाच्या चटक्‍यामुळे टक्‍केवारी घसरली

हडपसर – मतदान केंद्रावर उशिरा सुरू झालेली प्रक्रिया, मशीन बंद पडणे, प्रक्रियेत असणारा संथपणा आणि वाढत्या उन्हाचा चटका यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह फारसा जाणवला नाही. निवडणूक आयोगाने ठिकठिकाणी मतदान जागृती कार्यक्रम राबवून ही अपेक्षीत मताचा टक्‍का वाढला नसल्याचे दिसून आले.

शिरुर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदार संघात यंदा प्रथमच निरुत्साही वातावरण दिसले. सकाळी अकरा वाजेपर्यंत 11.05, दुपारी एक वाजेपर्यंत 22.20 तर तीन वाजेपर्यंत 31.50 टक्‍के मतदान झाले होते. उन्हाचा वाढता चटका मतदानाची टक्‍केवारी कमी करण्यास कारणीभूत ठरला पण दुपारी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर सर्वच मतदान केंद्रावर गर्दी वाढली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सुविधा न मिळाल्याने अनेक केंद्रांवर ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना जिना चढताना कसरत करावी लागली. सानेगुरूजी शाळेतील केंद्र व ससाणेनगर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील केंद्रावर सुमारे एकतास उशीराने मशीन सुरू झाल्याने अनेक मतदार कंटाळून मतदान न करताच निघून गेले. गंगाव्हिलेज येथे ज्येष्ठांना जिना चढून जावे लागल्याने त्रास सहन करावा लागला. ससाणेनगर येथे सखी मतदान केंद्रावर रांगोळी व इतर सजावट करून महिला मतदारांचे स्वागत करण्यात आले.

मगरपट्टा येथे सकाळी मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी उतरले होते. दुहेरी रांग लागलेली असतानाही मतदारांनी सुमारे दोन तासाच्यावर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ व आजारी नागरिकांनीही उत्साहाने मतदान केले. झोपडपट्टीपरिसरापेक्षा सोसायटीतील मतदार मतदानासाठी सकारात्मक राहिल्याचे पाहवयास मिळाले. दुपारच्या उन्हामुळे मात्र सर्वच केंद्रावर शुकशुकाट दिसला.

हडपसर गोंधळेनगर परिसरातील रणनवरे कुटुंबातील 32 व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला. “देशहिताच्या भान 100% मतदान’ असे फलक घेऊन या कुटुंबातील महिलांनी गोंधळेनगरपासून बंटर हायस्कूल केंद्रापर्यंत पायी जात मतदार जागृती करत मतदान केले. चालत जाऊन घरातील सर्वात ज्येष्ठ जयसिंगराव रणनवरे या 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही यात सहभाग होता. या कुटुंबातील व्यक्ती उद्योजक, इंजिनीअर, नोकरदार, नाट्य, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)