पुणे – अभियांत्रिकीच्या 7 परीक्षांचे निकाल चुकीचे

प्राध्यापकांचा दावा : विद्यापीठाकडून तपासणी सुरू

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या 2015-16 च्या प्रथम सत्रापासून 2018-19 च्या प्रथम सत्रापर्यंत एकूण 7 परीक्षांचे चुकीचे निकाल विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले जाहीर केले आहेत, असा खळबळजनक दावा दोन प्राध्यापकांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उठविली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

“विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टीम लागू केली आहे. त्याची स्वतंत्र्य नियमावली आहे. तसेच पदवी अभ्यासक्रमाला क्रेडिट सिस्टीम लागू करण्यात आली असून, त्याची नियमावली वेगळी आहे. त्यात ग्रेडनुसार निकाल जाहीर केला जातो. मात्र, विद्यापीठाने अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल पदव्युत्तर क्रेडिट सिस्टिमच्या नियमावलीनुसार जाहीर केला. वास्तविक पदवीच्या क्रेडिट सिस्टिमच्या नियमावलीस अनुसरून निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. पण, पदवीचा निकाल पदव्युत्तरच्या नियमावलीनुसार जाहीर केला आहे. ही गंभीर चूक आहे. ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यावर विद्यापीठाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही,’ अशी माहिती डॉ. अनिकेत खांडेकर आणि प्रा. कमलकिशोर अटल यांनी दिली.

या चुकांमुळे गेल्या सात परीक्षांचे आतापर्यंत सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांचा सदोष गुणपत्रिकांचे वितरण विद्यापीठाने केले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर, करिअरवर होणार आहे. या विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची परीक्षा मे-जून 2019 मध्ये आहे. या परीक्षांचे निकाल जुलैमध्ये अपेक्षित आहे. या चुका दुरूस्त करून दोषविरहित गुणपत्रिका व पदव्या विद्यार्थ्यांना देणे आवश्‍यक आहे. या सर्व प्रकारावर विद्यापीठाने आवश्‍यक ती कार्यवाहीवर करून त्यांच्या सर्व चुकीच्या गुणपत्रिका बदलून द्याव्यात. याप्रकरणी चुकांची जबाबदारी निश्‍चित करून संबंधित दोषी अधिकारी व पदाधिकारीवर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी या दोन प्राध्यापकांनी केली आहे.

अभियांत्रिकी निकालासंदर्भात प्राध्यापकांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची दखल घेत विद्यापीठाने तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती यापूर्वीच नेमली आहे. समितीचा अहवाल दोन दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)