पुणे – फळांच्या राजाच्या आगमनासाठी ‘रेड कार्पेट’

आंबा विक्रीसाठी स्वतंत्र शेड : वाहतूक कोंडी टळणार

पुणे – फळांचा राजा असलेल्या रत्नागिरी हापूसचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात आंब्याची आवक वाढण्यास सुरूवात झालेली आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यावेळी अतिरिक्त आवक होऊन वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे आंबा विक्रीसाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी टळणार असून इतर विभागही सुरळीत सुरू राहतील.

दरवर्षी गुलटेकडी मार्केट यार्डात आंबा हंगामात कोकण हापूससह परराज्यांतून मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होतो. हंगामात आंब्याचे मोठ्या प्रमाणात ट्रक बाजारात दाखल होत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, इतर व्यापारावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असत. त्यामुळे गेल्यावर्षी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाजार समितीने आडत्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिली होती. यंदाही केळी बाजाराजवळील गेट क्रमांक 7 लगत मोकळ्या जागेत आंबा विक्रीसाठी दालन उभारण्यास आडत्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार 22 ते 25 आडत्यांनी एकत्रित येत शेड उभारण्याचे काम सुरू केले आहे.

याबाबत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे सचिव रोहन उरसळ म्हणाले, “आंबा विक्रीसाठी उभारलेल्या शेडमध्ये फक्त शेतकऱ्यांकडून आवक होणाऱ्या कच्च्या आंब्याची लिलाव पद्धतीने विक्री होईल. दि.1 एप्रिलपासून नवीन दालनात आंबा विक्री सुरू होणार आहे. एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांसाठी या शेडमध्ये आंब्याची विक्री होईल.

आंब्याच्या अतिरिक्त आवकेमुळे वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी आडत्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र जागेत आंबा विक्रीस परवानगी दिली आहे. यामुळे आंब्यांची उलाढाल वाढून शेतकऱ्यांसह बाजार समितीलाही फायदा होईल. इतर व्यवहारही सुरळीत होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. बाजार समिती या शेडमध्ये आवश्‍यक त्या सुविधा पुरवेल.
– बी.जे.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)