पुणे – प्राध्यापक भरतीबाबत प्रश्‍नचिन्ह

सेट-नेट व पीएच.डी. धारक उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण

पुणे – वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक भरती करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्‍के आरक्षण लागू केल्याने आता सुधारित बिंदूनामावली (रोस्टर) तयार करून ती मागावर्गीय कक्षाकडून पुन्हा तपासून घ्यावी लागणार आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी प्राध्यापक भरती होईल का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ लागला असून सेट-नेट व पीएच.डी. धारक उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात सहायक प्राध्यापकांची 40 टक्‍के म्हणजेच सुमारे 3 हजार 500 रिक्‍त पदे भरण्यावरील निर्बंध शासनाकडून उठविण्यात आलेले आहेत. मात्र, आरक्षणात सतत बदल होऊ लागल्याने रोस्टरमध्ये बदल करावा लागत आहे. मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टरची अंतिम तपासणी झाल्यानंतरच महाविद्यालयांना उच्च शिक्षण विभागाकडून पद भरण्यासाठी “ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्यात येणार आहे. त्यानंतर शैक्षणिक संस्थांकडून प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आता प्राध्यापक भरतीसाठी नव्याने रोस्टर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पुन्हा पहिल्यापासून ही सर्व प्रक्रिया सुरू करावी लागेल. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वी प्राध्यापक भरती होईल का? याविषयी उमेदवारांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, मागासवर्गीय कक्षाने उच्च शिक्षण विभागाकडे भरती प्रक्रियेतील महाविद्यालयांची यादी मागितली आहे. या यादीनुसार रोस्टर तपासणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप यादीच मागासवर्गीय कक्षाकडे सादर करण्यात आलेली नाही.

प्राचार्य फोरमचे उपाध्यक्ष नंदकुमार निकम म्हणाले, राज्य शासनाच्या 10 टक्‍क्‍यांचा आरक्षणाच्या निर्णयाने प्राध्यापक भरतीसाठी रोस्टर पुन्हा तपासून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. राज्य शासनाने रोस्टर तपासणीसाठी विशेष शिबिर घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास एनओसी व जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब होणार नाही.

दरम्यान, नव्या 10 टक्‍के आरक्षणाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने मागासवर्गीय कक्षाला रोस्टर तपासणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीस दिरंगाई होणार नसल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाकडून देण्यात आली. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही प्राध्यापक भरती लवकरच सुरू होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का? यावरच प्राध्यापक भरतीची चिन्हे अवलंबून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)