पुणे – उड्डाणपुलासाठी प्राणी संग्रहालयाची जागा

कात्रज चौकात उड्डाणपूल : शहर सुधारणा समितीची मान्यता

पुणे – कात्रज चौकातील वाहतूक फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) कात्रज चौकात उड्डाणपूल उभाराला जाणार आहे. यासाठी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची काही जागा लागणार असून ही जागा देण्यासह येथे काम करण्यासाठी प्राधिकरणास ना हरकत प्रमाणपत्र देण्यास महापालिका शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे. हा पूल तातडीची गरज असून हा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीत ठेवला होता.

पालिकेच्या 1987 च्या मान्य विकास आराखड्यानुसार या मिळकतीमध्ये 30 मीटरचा डीपी रस्ता प्रस्तावित होता. नंतर 2017 च्या मान्य विकास आराखड्यामध्ये हा रस्ता 60 मीटर दर्शविला आहे. त्यापैकी राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील अस्तित्वातील सिमाभिंत रस्ता रुंदीने बाधित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या प्रस्तावित उड्डाणपुलाची आखणी 2017 च्या 60 मीटर डीपी रस्त्यामध्ये केलेली आहे. सदरच्या मान्य डीपी रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर उद्यान विभागाकडील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या “मास्टर प्लॅन’प्रमाणे सेवा रस्ता व खंदकाचे अंतर काही प्रमाणात कमी होणार आहे. तसेच उड्डाणपुलावर दोन्ही बाजूस “नॉईज बॅरिअर्स’ लावण्यात येणार आहेत. तसेच प्राणी संग्रहालयाची सिमाभिंत पुन्हा बांधण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्राण्यांना आवाजाचा कोणताही त्रास होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन ही जागा देण्यासह उड्डाणपुलाचे काम करण्यास ना हरकत पत्र देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

…आता प्रतीक्षा प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीची
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे कामकाज केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमावली व मार्गदर्शक तत्वानुसार चालते. राजीव गांधी प्राणी संग्रहालय विकसनासाठीचा पुढील 20 वर्षांचा बृहत आराखडा केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मंजूर केलेला आहे. त्याप्रमाणे प्राणी संग्रहालय परिसरातील उपलब्ध जागी नवीन खंदक, पर्यटकांसाठी सोयी सुविधा, प्राणी खंदकासाठी सेवा रस्ता इत्यादी विकास कामे टप्या-टप्प्याने केली जाणार आहेत. प्राधिकरणाच्या प्रचलित धोरणानुसार, उपलब्ध जागेपैकी 30 टक्‍के जागा “ग्रीन झोन’ सोडून उर्वरित ठिकाणी हा विकास करण्यात येणार आहे. त्यातच आता उड्डाणपुलासाठी जागा ( 60 मीटर डीपी रस्ता) उपलब्ध करुन द्यावयाची झाल्यास या आराखड्यात बदल करावा लागणार आहे. हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून संग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे या प्रस्तावात नमूद केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)