पुणे – वाहनतळ ठेकेदाराचा ठेका होणार रद्द

पोलीस उपअधिक्षकास मारहाणप्रकरण : यापूर्वीही अनेक तक्रारी

पुणे – महापालिकेच्या वाहनतळातील पार्किंगच्या दराबाबत विचारणा केली म्हणून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस उप-अधीक्षकांना मारहाण करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या ठेकेदाराच्या यापूर्वीही अनेक तक्रारी आल्याने हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नागरिकांना आपली वाहने सुरक्षीत ठिकाणी पार्किंग करून खरेदी व इतर कामांसाठी मंडई व आप्पा बळवंत चौक परिसरात जाता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने नारायण पेठ येथे कै. शिवाजीराव आढाव वाहनतळ उभारण्यात आले आहे. पोलीस उप-अधीक्षक दत्तात्रय भापकर हे बुधवारी रात्री येथील वाहनतळामध्ये आपली चारचाकी पार्किंग करून कामानिमित्त आप्पा बळवंत चौकात गेले होते. ते परत आल्यानंतर येथील ठेकेदाराच्या लोकांमध्ये आणि भापकर यांच्यामध्ये पार्किंगचे जास्त पैसे घेण्यावरून वाद झाले. यात दहा ते पंधरा जणांनी भापकर यांना मारहाण केली. याप्रकरणी भापकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वाहनतळाचा ठेका देताना पार्किंगचे शुल्क निश्‍चित केलेले असतानाही शहरातील अनेक वाहनतळांवर जास्त पैसे उकळण्यात येत असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यातच वाढीव शुल्कावरून झालेल्या मारहाणीच्या प्रकाराची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. या ठेकेदारासंबंधी यापूर्वीही अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. शिवाय, या ठेकेदाराची मुदत येत्या 23 मार्चला संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, असा प्रस्ताव मालमत्ता विभागाने पालिका आयुक्तांना दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)