पुणे – टॅंकरचा आकडा दोन लाखांवर!

पुणे – मागीलवर्षीपेक्षा या वर्षी पण्याच्या टॅंकरची संख्या वाढली असून, आत्ताच ती दोन लाखांच्या पुढे पोहोचली आहे. कडक उन्हाळा सुरू होण्याआधीच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी किमान आठ ते दहा हजारांनी टॅंकरची संख्या वाढली आहे. अजून मार्च महिना पूर्ण झाला नसून, ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

धरणसाठा कमी असल्याबाबतची पूर्वसूचना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती. त्यावरून महापालिकेने पाणी वाटपाच्या वेळेसंबंधीचे फेरनियोजन केले होते. तर, पाणीकपात करावी लागणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्र्यांनीही केले होते. मात्र, विरोधकांनी पाण्याबाबत विरोधाची धार अतिशय तीव्र केल्याने या सगळ्या नियोजनाचा महापालिका प्रशासनाला फेरविचार करावा लागला. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली सलग चार गुरूवार पाणीपुरवठा बंद ठेवला. त्यामुळे आणखी टीका करण्यात आली.

या सगळ्याची परिणती म्हणून जानेवारीपासूनच टॅंकरची संख्या वाढली. मागीलवर्षी जानेवारीत 15,840 टॅंकर लागले, तर यावर्षी ती संख्या 19,639 वर गेली आहे. तर एकूणच टॅंकरची संख्या मागील वर्षी एप्रिल 2017 ते मार्च 2018 पर्यंत 1,98,232 एवढी होती. तर यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 2,06,250 एवढी झाली आहे. त्यामुळे धरणसाठा लक्षात घेता यावर्षीही पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत नियोजन करणे आवश्‍यक असल्याने, या कालावधीपर्यंत टॅंकरची संख्या मागील वर्षीपेक्षा अधिक वाढण्याची शक्‍यता या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पूर्व भागाची भिस्त टॅंकरवरच
भामा-आसखेडचा प्रकल्प यावर्षीही विरोधामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे नगर रस्ता आणि त्यापुढील काही भागांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत चालले आहे. या शिवाय वडगाव शेरी, हडपसर येथील बहुतांश भाग हा टॅंकरवरच अवलंबून असणारा आहे. याशिवाय अनेक भागात आजही दोन, तीन दिवसाआड पाणी मिळते. अशा परिस्थितीत त्या भागातील नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)