पुणे – पंधरा दिवसात टॅंकरची संख्या तब्बल 100 ने वाढली

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता

पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे पाणीटंचाई झळ आणखीन वाढली असून, मागील पंधरा दिवसात टॅंकरची संख्या तब्बल 100 ने वाढल्यामुळे विभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या 406 वर जावून पोहचली आहे. दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यात ही झळ आणखीन वाढणार असल्यामुळे विभागात टंचाईशी सामना करणे प्रशासनासमोर मोठे आवाहन आहे.

विभागातील या चार जिल्ह्यांच्या 28 तालुक्‍यांमधील 376 गावे 2 हजार 600 वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 406 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. तर पंधरा दिवसांपूर्वी टॅंकरची संख्या 306 एवढी होती. सद्यस्थितीत टंचाईग्रस्त भागातील सुमारे 8 लाख 15 हजार 817 लोकसंख्या आणि 44 हजार 998 जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, पाण्याबरोबरच चाराटंचाईचा प्रश्‍नही उद्‌भवू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमधील 46 गावे 503 वाड्यांमध्ये पाणी टंचाई असून, बारामती येथे 22 तर शिरूर येथे 17 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 315 लोकसंख्येला तब्बल 80 टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील पंधरा दिवसात 6 टॅंकर वाढले आहेत. बारामती, शिरूरसह दौंड आणि पुरंदर तालुक्‍यात प्रत्येकी 9, आंबेगाव 12, हेड 4, जुन्नर 3, हवेली आणि इंदापूर तालुक्‍यात प्रत्येकी 2 टॅंकर सुरू आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र असून, 1 लाख 63 हजार लोकसंख्येचे तहान भागवण्यासाठी तब्बल 68 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सांगलीच्या पाच तालुक्‍यांतील 113 गावे 769 वाड्यांमधील सुमारे 2 लाख 43 हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 108 टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्‍यांत पाणीटंचाई चांगलीच वाढली असून, आटपाडीमध्ये 21, कवठेमहांकाळ आणि खानापूर येथे प्रत्येकी 8 आणि तासगांवमध्ये 3 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाचा चटका वाढताच सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मागील पंधरा दिवसात सोलापूरमध्ये 64 वर असलेली टॅंकरची संख्या 117 वर गेली आहे. त्यावरून टंचाईची अभिषणता लक्षात येईल. सद्यस्थितीत 115 गावे, 862 वाड्यांमधील 2 लाख 45 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्‍यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

सातारा जिल्ह्यात टॅंकरची संख्या 100 वर
सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात असलेल्या माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्‍यांमध्ये पाणी टंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील 102 गावे 466 वाड्यामध्ये तब्बल 101 टॅंकर सुरू आहेत. विभागात माण तालुक्‍यात पाणीटंचाई सर्वांत भिषण परिस्थिती असून, तब्बल 64 टॅंकरने 55 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 359 हून अधिक लोकसंख्या आणि 25 हजारांहून अधिक जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. खटाव तालुक्‍यात 14 तर कोरेगांव येथे 17 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)