पुणे – आपल्या जगण्यातील आनंद निघून गेला

सतीश आळेकर : मेघा पानसरे व अविनाश बर्वे यांना “संघर्ष सन्मान पुरस्कार’ प्रदान

पुणे – आपला भारत देश विविध संस्कृतींनी नटलेला आहे. भारतात सुबत्ता येत आहे, पैसा खळखळतो आहे; परंतु जगण्यातील आनंद निघून गेला आहे, जीवनातून काहीतरी निसटते आहे ही भावना सतत जाणवत आहे, असे मत सतीश आळेकर यांनी व्यक्‍त केले. ते संघर्ष सन्मान पुरस्काराचे वितरण करताना बोलत होते.

मुक्‍तांगण व्यसनमुक्‍ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अविरत संघर्ष करणाऱ्या मेघा पानसरे आणि विशेष व्यक्‍तींना कायमस्वरूपी घर मिळवून देणारे अविनाश बर्वे यांना ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते “संघर्ष सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी मुक्‍तांगणच्या उपसंचालक मुक्‍ता पुणतांबेकर, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट, अध्यक्ष ए. पी. जोशी आदी उपस्थित होते. मेघा पानसरे आणि अविनाश बर्वे यांच्याशी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी संवाद साधत त्यांची संघर्षमय वाटचाल उलगडली.

लोकशाही मूल्यांविषयी चिंता, धास्ती वाटावी असा हा प्रवास आहे. समाजात या घटनेबाबत एका बाजूला क्रोध, तर दुसऱ्या बाजूला ते दडपणाखाली देखील आहेत. न्यायव्यवस्था वांरवार सरकारला या हत्येसंदर्भात जाब विचारत आहे; परंतु केवळ राजकीय इच्छाशक्‍तीच्या अभावामुळे तपासाला गती प्राप्त होत नाही आहे. हताश न होता लढा सुरुच ठेवण्याचा आम्ही निर्धार केला आहे. न्यायालयाने अनेकदा तपास यंत्रणांना फटकारले आहे, तरी देखील हा भरकटलेला तपास वाटेवर येत नाही ही खंत आहे, असे मेघा पानसरे म्हणाल्या.

माझ्या मुलाचे “विशेष’ असल्याचे निदान झाल्यानंतर मी त्याला एक बाप म्हणून स्वीकारले. विशेष मुलांसाठी असणाऱ्या शाळेत त्याला घातले. मात्र, नियमानुसार त्याला 18 वर्षांनंतर त्याला शाळेत ठेवता येणार नव्हते, म्हणून कर्नल काळे यांनी सूचविल्याप्रमाणे वसतीगृह सुरू करण्याच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला. तो प्रवास नक्‍कीच सोपा नव्हता. जो निसर्ग दुःख देतो, तोच दुःख पचविण्याची ताकदही देतो याचीच प्रचिती मला आली, अशी भावना अविनाश बर्वे यांनी व्यक्‍त केली.

आधी समाजात वावरताना जातीचा अंदाज घेतला जात होता, आता तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याचा धांडोळा घेतला जातो. तुम्हांला तुमच्या धर्माची ओळख प्रकर्षाने करुन दिली जाते हे खेदजनक आहे. हिंसेचे उत्तर हिंसेने देता येत नाही असे मानणारे नागरिक अजूनही भारतात आहेत, हे आपले भाग्यच आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)