पुणे – चोरांकडून जप्त केलेले सोने पोलिसांनीच विकले

पुणे – गस्त घालीत असताना चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 27 ग्रॅम वजनाचे सोने पोलिसांनीच परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मंगलदास चौकीचा बीट मार्शल आकाश बलदेव सिमरे (वय-32, रा. पोलीस लाइन, औंध) याला अटक केली आहे. संबंधित चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे आणि साक्षीदाराकडे करण्यात आलेल्या चौकशीतून ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येरवडा पोलिसांनी सिमरे याला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रकाश चामुने (वय-50, रा. उत्तम टाऊनशीपजवळ, प्रतीकनगर) यांच्या घरात 2 फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी चामुने यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून बेडरूममधील 3 लाखांचा ऐवज चोरला होता. त्यात सोन्याचे दागिने, घड्याळ आणि रोख रक्‍कमेचा समावेश होता. या गुन्ह्यात शाहरुख समील शेख (वय-19, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली होती. तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. चोरीच्या दुसऱ्या दिवशी शेख आणि साक्षीदार मल्हारी प्रकाश शिंदे यांच्यात रूबी हॉल हॉस्पिटलजवळ भांडणे झाली. त्यामुळे गस्तीवर असलेल्या सिमरे याने त्यांची अंगझडती घेतली. त्यात सिमरेला चोरीच्या बांगड्या आरोपींकडे मिळाल्या. संबंधित सोने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याऐवजी त्याने ते सोनाराला विकले आणि त्याचे पैसे घेतले, असे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सिमरे आणि नितीन फकीर शिंदे (वय-29, रा. हिंगणेमळा, हडपसर) यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)