पुणे – बालेवाडी स्टेडियमला छावणीचे स्वरूप

ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनावर

पुणे – शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य बंद असलेल्या ईव्हीएम मशीन बालेवाडी स्टेडियम येथे ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी स्ट्रॉगरूम तयार करण्यात आली आहे. सुमारे 22 दिवसांनी मतमोजणी होणार असल्याने ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. या गोदामाला छावणीचे स्वरूप आले असून याठिकाणी 24 तास सीआरपीएफचे जवान आणि पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

शिरूर व मावळसाठी सोमवारी (दि.29) मतदान झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 296 तर मावळ लोकसभा मतदारसंघात 2 हजार 504 मतदान केंद्र होती. या सर्व केंद्रांवरील मतदान झाल्यानंतर या मशीन विधानसभा मतदारसंघाच्या मुख्य ठिकाणी एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व ईव्हीएम मशीन बालेवाडी येथील स्टेडियममध्ये आणण्यात आली. ईव्हीएम मशीनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

शिरूर व मावळमधील ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या ठिकाणी स्ट्रॉगरूम तयार करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखेखाली या रूम सील करण्यात आल्या आहेत. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली आहे. सीआरपीएफचे जवान यांचा याठिकाणी बंदोबस्त राहणार आहे. हे जवान 24 तास खडा पहारा देत आहे. याशिवाय स्ट्रॉगरूमच्या बाहेरच्या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय, विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी हे याठिकाणी येऊन याची पाहणी करणार आहेत. त्यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून दरदिवशी नेमून दिलेले सहायक निवडणूक अधिकारी पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देणार आहेत.

* बालेवाडी येथील स्टेडियममध्ये शिरूर व मावळमधील ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या
* याठिकाणी स्ट्रॉगरूम तयार करण्यात आली आहे.
* सीआरपीएफच्या जवानांचा 24 तास बंदोबस्त राहणार
* सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले
* दि.23 मे रोजी होणार मतमोजणी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)