पुणे – सव्वा लाख शिक्षकांची निवडणूक कामातून ‘सुट’का

दहावी, बारावीच्या शिक्षकांना दिलासा

पुणे – राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून सुटका होणार हे आता निश्‍चित झाले आहे. यामुळे या जवळपास सव्वा लाख शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

-Ads-

राज्याच्या विविध विभागात इयत्ता दहावी व बारावीची लेखी परीक्षा 22 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. या कामकाजात बहुसंख्य शिक्षक गुंतले आहे. या परीक्षेच्या कामासाठी आधीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, मुख्यनियामक, नियामक, परीक्षक म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, लिपीक, शिपाई यांच्या नेमणुका केल्या जातात. लेखी परीक्षा संपल्यानंतर पेपर तपासणीचे काम परीक्षक व नियामक यांच्याकडे सोपविण्यात येत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल 5 जून पूर्वी जाहीर करणे आवश्‍यक आहे.

“या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीचे कामकाज देऊ नये,’ अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे फेब्रुवारीमध्येच केली होती. एप्रिल अखेर सुमारे 2 कोटी उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज पूर्ण करुन निकाल वेळेत द्यायचा आहे, असेही महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी निवेदनात नमूद केले होते. राज्यमंडळालाही त्यांनी निवेदन दिले होते. राज्यमंडळाने त्याची सकारात्मक दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदने पाठविली होती.

यावर “या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना निवडणुकीची डयुटी देऊ नये व नियुक्ती दिली असल्यास ती रद्द करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. शिक्षक महासंघाचे जिल्हानिहाय पदाधिकारी संबंधित शिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून निवडणूकीच्या कामकाजाबाबतचे आदेश रद्द करुन घेतील,’ असेही देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे 80 हजार, तर बारावीच्या परीक्षेसाठी 50 हजार जणांवर परीक्षक व नियामक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. यातील सर्वांनाच निवडणुकीच्या कामकाजात सहभागी करुन घेण्यात येणार नव्हते. मात्र ज्याच्या सहभागी होण्याची शक्‍यता होती ती सुध्दा आता दूर झाली आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
14 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)