पुणे – अतिरिक्‍त आयुक्तांना धक्काबुक्की-शिवीगाळ

महापौरांसमोरच भिरकावली चप्पल, “राडा’ टळला


जलपर्णी निविदा प्रक्रियेत गैरव्यवहाराचा आरोप


विरोधक आक्रमक, प्रशासनही करणार कारवाई

पुणे – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या समोरच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यावेळी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चप्पलही भिरकावली. त्यामुळे महापालिकेत गोंधळ उडाला होता. यावेळी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना तातडीनं सुरक्षितस्थळी नेल्याने मोठा वाद टळला. दरम्यान, या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत महापौरांसह, सर्व पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक सुरू होती.

महापालिकेने काढलेल्या जलपर्णी निविदाप्रकरणी मोठा गैरव्यवहार झाला असून ही निविदा रद्द करावी, तसेच संबंधितांची तातडीने चौकशी करावी, या मागणीसाठी महापालिकेतील कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, शहराध्यक्ष चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही नगरसेवक मोठ्या संख्येने महापौरांच्या दालनात दुपारी 4 वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन केले. “हा प्रकार गंभीर असून याची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावेळी महापौरांनी आयुक्तांशी संपर्क साधला. मात्र, आयुक्त महापालिकेत नसल्याने महापौरांनी अतिरिक्त आयुक्तांना याबाबत माहिती घेण्यासाठी बोलविले. त्यावेळी आंदोलक नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर हे एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष असून त्यांनीच या निविदेला मान्यता दिली आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधिशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, तोपर्यंत निंबाळकर महापौर दालनात होते. नंतर ते महापौरांना या निविदा प्रक्रियेची माहिती देतानाच त्या 9 पट अधिक दराने आल्याचे सांगत होते. त्याच वेळी काही आंदोलकांनी अधिकारी चोर आहेत. त्यांच्याकडेच चौकशी कशाला, असे शब्द वापरले. या वाक्‍याने संतापलेल्या निंबाळकर यांनी तुमची लायकी काय? असे शब्द उच्चारले. त्यामुळे आंदोलक नगरसेवक चांगलेच संतापले. तेवढ्यात आंदोलकांमधून एक चप्पल अतिरिक्‍त आयुक्तांच्या दिशेने आली. या प्रकारामुळे अचानक गोंधळ उडाला. हा गोंधळ आणखी वाढण्याची शक्‍यता लक्षात पालिकेच्य सुरक्षा रक्षकांनी लगेचच निंबाळकर यांना महापौर दालनाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी काही कार्यकर्त्यांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यात त्यांच्या खांद्याला तसेच पाठीला मार लागला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित नगसेवक तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

मध्यस्थीची चर्चा निष्फळ
घटनेनंतर महापौर मुक्ता टिळक यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी आयुक्‍त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, रूबल अग्रवाल, विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे, बराटे यांनी “या प्रकाराबाबत आमच्या सदस्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगतो, मात्र, अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी दिलगिरी व्यक्त करावी,’ अशी मागणी केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे ही मध्यस्थीची चर्चा निष्फळ ठरली आहे.

हा प्रकार माझ्या दालनात घडला ही दुर्देवी बाब आहे. अशा प्रकार घडणे म्हणजे गुंडशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत पुढील कार्यवाही करण्याचा अधिकार प्रशासनाचा आहे. त्यानुसार, आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांनी जी कारवाई करायची आहे, त्याचा निर्णय घ्यावा.

– मुक्ता टिळक, महापौर, पुणे.


महापौरांकडे न्याय मागत असताना अधिकारी येतात व नगरसेवकांची लायकी काढतात हा पुणेकरांचा अपमान आहे. त्यास महापौर तसेच सत्ताधारीही सहमती दर्शवितात, ही बाब दुर्देवी आहे. जलपर्णीप्रकरणी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचे यावरूनच समोर येते.
– अरविंद शिंदे, गटनेते, कॉंग्रेस.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)