पुणे – दोन विभागांतील समन्वय अभावाचे पुन्हा दर्शन

पुणे – महापालिकेतील दोन विभागांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले असून, आता एका विभागाने अंतर्गत पत्रव्यवहार करून दुसऱ्या विभागाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, सहकार्य करण्याबद्दल त्यांना आणि वाहतूक पोलिसांना पत्र पाठवले आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनचे संथ गतीने सुरू असलेले काम, येथील पदपथ आणि रस्त्याच्या कडेला बिनदिक्कतपणे पार्क केलेली वाहने आणि अतिक्रमणे यामुळे अत्यंत वर्दळीच्या फर्गसन रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डीझाईन गाईडलाईननुसार सुरू असलेल्या पदपथाच्या कामावरही याचा परिणाम होत असून, पथविभागाने महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा, अतिक्रमण विभागासह वाहतूक पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, तातडीने काम पूर्णत्त्वाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती या पत्रातून केली आहे.

महापालिकेच्या पथ विभागाकडून फर्गसन रस्त्यावर गुडलक चौक ते शेतकी महाविद्यालय या दोन कि.मी.च्या पट्ट्यात दोन्ही बाजूला पदपथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामाची मुदत 18 महिने असून, आता निम्माच कालावधी राहिला आहे. पदपथ करताना या रस्त्यावरील सर्व सेवा वाहिन्या पदपथाखाली घेण्यात येत आहेत. यासाठी पथविभागाने खोदाई देखील केली आहे. महापालिकेने चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी या रस्त्यावर नवीन पाईपलाईन टाकण्याचेही नियोजन केले आहे. पाणीपुरवठा विभागाने खोदाई केलेल्या ठिकाणी पाईपलाईन टाकल्यास हे खड्डे बुजवून रस्ता आणि पदपथाचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यासाठी पथविभाग सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित काम करत असलेला ठेकेदार अत्यंत संथ गतीने काम करत असल्याने मागील दीड महिन्यांपासून खड्डे तसेच उघडे पडले आहेत.

पदपथांवर अतिक्रमण
कामासाठी केलेल्या खोदाईमुळे पादचारी नागरिकांना रस्त्यावर चालता येत नाही. दुसरीकडे येथील पदपथांवर मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरूनच चालावे लागत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी फर्गसन रस्त्याप्रमाणेच बिबवेवाडी, लक्ष्मी रस्ता, सातारा रस्ता, कर्वेनगर येथील फ्लाय ओव्हर ते कमिन्स कॉलेज दरम्यानचा रस्ता याठिकाणीही रस्त्याची कामे सुरू असून पदपथांवर अतिक्रमण वाढले आहे. ही अतिक्रमण हटवून पदपथ मोकळे करावेत, असे पत्रही पथविभागाने अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांना दिले आहे.

बेकायदेशीर पार्किंग
काम सुरू असताना अनेक वाहनचालक विशेषत: दुचाकी या पदपथांवर आणि लगतच्या गल्ल्यांमध्ये बेकायदेशीररित्या उभ्या केल्या जातात. त्याचाही नागरिकांना अडथळा होत असून, त्या वाहतूक कोंडीमध्ये भर घालत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा बेकायदेशीररित्या उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करून जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र वाहतूक पोलिसांना दिल्याचे पथविभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)