पुणे – शासनाकडून तात्पुरती मलमपट्टी

राज्य परीक्षा परिषदेत पदोन्नतीने तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे – राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तीन सहायक आयुक्तांना पदोन्नतीने नियुक्ती दिली आहे. यातील दोन सहायक आयुक्त लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे शासनाकडून पदोन्नतीने रिक्त पदे भरून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली आहे.

राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे. यामार्फत महत्त्वाच्या परीक्षा नियमित घेण्यात येतात. या ठिकाणी वर्ग 1 व 2 ची पदे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत भरण्यात येतात. वर्ग 3 व 4 मधील सर्व अधिकारी व कर्मचारी हे ठेकदारी तत्त्वावरच कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून परीक्षा परिषदेतील उपायुक्त, सहायक आयुक्तांची काही पदे रिक्त होती. यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. अध्यक्षपदी दत्तात्रय जगताप पूर्णवेळ कार्यरत आहेत. आयुक्त पदाची तुकाराम सुपे यांच्याकडे प्रभारी सूत्रे आहेत.

संजय काळे, शशिकांत चिमणे, प्रविण गायकवाड या तीन अधिकाऱ्यांवर प्रत्येकी दोन-तीन विभागांच्या कामाचा अतिरिक्त बोजा अनेक महिन्यांपासून टाकण्यात आला होता. परीक्षा परिषदेतील रिक्त पदे भरावीत यासाठी शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहारही केला होता. मात्र, त्याची दखलच घेतली जात नव्हती. अखेर काही तरी दखल घेतल्याचा दिखावा शासनाकडून करण्यात येऊ लागला आहे. गेल्या पाच महिन्यांत स्मिता गौड व उत्तम खरात यांची नियुक्ती परीक्षा परिषदेत करण्यात आली. त्यातही पुन्हा गौड यांची बदली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयात करण्यात आली. परीक्षा परिषदेतील शिष्यवृत्ती विभागाचा अतिरिक्त कार्यभार मात्र त्यांच्याकडे कायम ठेवला आहे. शासनाने गेल्या आठवड्यात 7 मार्च रोजी पदोन्नतीने अनिल गुंजाळ, ज्ञानेश्‍वर जून्नरकर, अलका मुळीक या तीन अधिकाऱ्यांची सहायक आयुक्ती पदी नव्याने नियुक्तीचे आदेश काढले. यात जून्नरकर हे येत्या 31 मार्चला तर मुळीक या 30 जूनला सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे दोन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सहायक आयुक्तांची पदे रिक्तच राहणार आहेत हे उघडच आहे. यातून शासनाकडून केवळ तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)