पुणे – शिक्षक भरतीता लवकरच मुहूर्त ?

शिक्षण आयुक्‍तांची नवी घोषणा : 11 हजार जागा भरल्या जाणार

पुणे – राज्य शासनाच्या वतीने “पवित्र’ पोर्टलद्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी केवळ 11 हजार शिक्षक भरतीच्या जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार आहे. बिंदूनामावली नोंदणीला शासकीय व खासगी संस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे उघड झाले आहे. यामुळेच जाहिरातींची तारीख सतत लांबणीवर पडत चालली असल्याने उमेदवार संतप्त झाले आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अगदी सुरुवातीला 24 हजार शिक्षकांची भरती पारदर्शकपणे करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात विविध कारणांमुळे भरतीच्या जागांची संख्या कमी होत चालली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीवरून आता वादही उफाळू लागले आहेत. सर्वाधिक शिक्षक भरतीच्या जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्‍त आहेत. भरतीच्या जाहिराती 3 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारीला काढण्याच्या घोषणा शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

शिक्षक भरतीच्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध न झाल्याने डी.टी.एड्‌., बी.एड्‌. स्टुडंट असोसिएशनच्या वतीने गेल्या सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यातील उमेदवारांची प्रकृती सतत खालावत चालली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू असतात. उपचार झाल्यानंतर या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन सुरूच ठेवले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष संभाजी शिरसाट व राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांवळे, सरचिटणीस प्रसाद तनपुरे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप बालवडकर, कार्याध्यक्ष महेश पाटील आदींनी उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिक्षक भरतीच्या जाहिराती त्वरित काढा, असा आग्रह त्यांनी शिक्षण आयुक्‍तांकडे धरला. आयुक्‍तांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज्यातील 20 जिल्ह्यामधील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या बिंदूनामावली तपासून तयार झाल्या आहेत. त्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे कामही सुरू आहे. प्राथमिक शाळांमधील 8 हजार 500 व माध्यमिक शाळांमधील 2 हजार 500 शिक्षकांच्या पदांसाठी आता लवकरच जाहिरात काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सोळंकी यांनी जाहीर केले आहे.

माध्यमिक शाळांच्या 1 हजार 492 संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. यातील 800 संस्थाची बिंदूनामावली तयार झाली असून यातील 400 संस्थांनीच बिंदूनामावली पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. यामुळे माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या फारशा जागा शिल्लक राहिल्या नाहीत हे उघड झाले आहे.

ग्रामविकास विभाग व शिक्षण विभाग यांच्यात समन्वय होत नसल्याने भरती प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. ग्रामविकास विभागाने आधी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना प्राधान्य दिले आहे. यामुळे बहुसंख्य जिल्हा परिषदांनी केलेली नाही. इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षकांसाठी ग्रामविकासकडे 4 हजार शिक्षकांच्या जागा आहेत. मात्र, या जागांच्या भरतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हा तिढा सुटल्यास भरतीच्या जागांमध्ये निश्‍चित वाढ होणार आहे.

सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) सवर्गांसाठी 16 टक्‍के आरक्षण शासनाने लागू केले आहे. मात्र, बहुसंख्य जिल्ह्यांतील शाळांमधील या संवर्गांतील जागा या आधीच फुल्ल झालेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या संवर्गांसाठी काहीच जागा शिल्लक राहिल्या नसल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे.

शिक्षण आयुक्‍तांची डोकेदुखी वाढतेय
शिक्षक भरतीसाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील उमेदवारांकडून सारखेच फोन, व्हॉटस्‌ऍप मेसेजेस येत असल्याने शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. विविध संघटनांची शिष्टमंडळे, शिक्षक, नागरिक, अधिकारी हे सतत आयुक्‍तांना भेटायला येत असतात. त्याच्यांची चर्चा करण्यात व बैठका घेण्यात खूप वेळ वाया चालला आहे. यामुळे भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी अडथळेच जास्त येऊ लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)