पुणे – टीडीआरचा मोबदला टीओडीत नको

महापालिका दोन दिवसांत शासनाकडे हकरत पाठविणार

पुणे – मेट्रो प्रकल्पासह वाहतूक निधी उभारण्यासाठी राज्य शासनाने ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट (टीओडी) धोरणास मान्यता देताना या धोरणानुसार, जो 25 टक्के “टीडीआर’ वापरला जाणार आहे. त्या “टीडीआर’मधील हिस्सा रोख रकमेच्या स्वरुपात महापालिकेस मेट्रो प्रकल्पासाठी द्यावा लागणार आहे. या तरतूदी महापालिकेने विरोध केला असून याबाबतची हरकत शासनाकडे पुढील दोन ते तीन दिवसांत पाठविली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य शासनाने सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना चालना आणि पूरक विकास करण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतुदीनुसार, हे “टीओडी’ धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, मेट्रो स्थानकाच्या परिघात 500 मीटरपर्यंत रस्ता रुंदीच्या प्रमाणात जास्तीत जास्त 4 “एफएसआय’ अर्थात चटई क्षेत्र निर्देशांक वापरता येणार आहे. त्यामुळे “प्रीमियम एफएसआय’ला चालना मिळणार असून त्यातून निधी उपलब्ध होणार आहे. शासनाने हे “प्रीमियम एफएसआय’चे दर निश्‍चित करताना ते निवासी बांधकामासाठी रेडीरेकनरच्या 60 टक्के, तर व्यावसायिक मिळकतीसाठी रेडीरेकनरच्या 75 टक्के निश्‍चित केले आहेत. मात्र, त्याचवेळी शासनाने “टीडीआर’लाही चालना मिळावी या उद्देशाने “प्रीमियम एफएसआय’ विकत घेताना, 25 टक्के “टीडीआर’च्या वापरासही मुभा दिली आहे. बाजारात सध्या “टीडीआर’चे दर हे रेडीरेकनराच्या दराच्या 40 ते 45 टक्के आहेत. त्यामुळे “टीडीआर’चे दर “प्रीमियम एफएसआय’पेक्षा 10 ते 15 टक्के कमी असल्याने बाजारात पडून असलेल्या “टीडीआर’चे मार्केट वाढेल तसेच महापालिकेस त्यामुळे आरक्षणे ताब्यात घेण्यास मदत होईल, असे वाटत असतानाच; हे धोरण करताना “टीडीआर’ 25 टक्के वापरातील मेट्रोला काही हिस्सा रोख रकमेत महापालिकेने मेट्रोला देणे बंधनकारक केले आहे.

मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून विकास आराखड्यात आरक्षित जागा “टीडीआर’ तसेच “एफएसआय’चा मोबदला देऊन ताब्यात घेतल्या जातात. हे भूसंपादन करण्यासाठी पालिकेकडे रोख रक्कम नसल्याने जागा मालकास “टीडीआर’ दिला जातो. त्यामुळे पालिकेस एकाच बाबीसाठी दोन वेळा मोबदला द्यावा लागणार असल्याने ही तरतूद रद्द करावी अशी मागणी शासनाकडे या हरकतीद्वारे घेण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)