पुणे – पाणी टंचाईग्रस्त भागात उपाययोजना करा

पाणी आणि चारा टंचाईच्या बैठकीत जि.प.सदस्यांची मागणी

पुणे – जिल्ह्यात पाण्याची टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे टॅंकर वेळेत गेले पाहिजेत. टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या संबंधित एजंटला दंड आकारण्यात यावा. जुन्नर तालुक्‍यात टॅंकरचे पाणी टाकण्यासाठी टाक्‍यांची उपलब्धता लवकर व्हावी. कारण पाणी योजना बंद झाल्या आहेत. त्याठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच टॅंकरग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी आयोजित पाणी आणि चारा टंचाईच्या बैठकीत केली.

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आणि चारा टंचाईबाबात बैठक पार पडली. यावेळी महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, पशुसंवर्धन आणि समाजकल्याण सभापती सुजाता पवार यांच्यासह सदस्य शरद बुट्टेपाटील, आशा बुचके, रणजीत शिवतरे, कीर्ती कांचन, दत्तात्रय झुरंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपजिल्हाधिकारी जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यासह अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

जुन्नर तालुक्‍यात टंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून टॅंकरचे पाणी टाकण्यासाठी टाक्‍यांची उपलब्धता लवकर करावी, अशी मागणी सदस्य आशा बुचके यांनी केली. जिल्ह्यात दैनंदिन टॅंकर वेळेनुसार गेले पाहिजेत तर मंजुरी मिळालेले टॅंकर वेळेत सुरू न झाल्यास संबंधित एजन्सीला दंड आकारण्यात यावा. तसेच धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे खेड तालुक्‍यातील आवश्‍यक तापुरत्या पुरक योजनेचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे. रणजित शिवतरे म्हणाले, दुर्गम भागात छोट्या पिकअपद्वारे पाणीपुरवठा करून प्रलंबित पाणीपुरवठ्याची देयके वेळेत द्यावी. अमोल नलावडे यांनी वेल्हा तालुक्‍यातील टॅंकरग्रस्त गावे टॅंकरमुक्त होण्यासाठी आतापासून उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली. यावेळी मागील तीन वर्षांमध्ये टंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यातील प्रत्येक टंचाईग्रस्त गावांमध्ये वेळेत पाणी मिळावे. त्याठिकाणी पाण्याची कमतरता भासू नये याची दक्षता घेऊन सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय साधून पुढील कार्यवाही करावी.
– विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)