पुणे – स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला

आणखीन चार रुग्णांना लागण : अतिदक्षता विभागातील रुग्ण संख्येत वाढ

पुणे – हुडहुडी भरणारी थंडी संपली आता उन्हाचा चटका सुरू झाला असूनही शहरातील स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. तर दिवसेंदिवस वाढत आहे. ढगाळ वातावरण आणि मध्येच उन्ह यामुळे वातावरणात बदल झाला असून, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भावामुळे सद्या 10 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, गुरुवारी (दि.21) दिवसभरात 4 स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जानेवारी-2019 मध्ये शहरात स्वाइन फ्लूने एका मुलाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्याचबरोबर 46 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्यामुळे स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. परंतु, मागील दोन दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढलेला असतानाही स्वाईन फ्लूचा संसर्ग कमी झालेला नाही. आज दिवसभरात 2 हजार 636 व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चार व्यक्तींना संसर्ग झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 58 व्यक्ती संशयीत म्हणून आढळून आले असून, त्यांना टॅमीफ्लूची औषधे देऊन घरी सोडण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत (1 जानेवारी 2019 पासून) 1 लाख 16 हजार व्यक्तींच्या तपासणीतून 31 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 1 हजार 358 व्यक्तींना टॅमीफ्लूची औषधे देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

स्वाईन फ्लूपासून अशाप्रकारे काळजी घ्या..
– घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल, मास्क बांधून बाहेर पडावे
– आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जावू नये
– सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत
– जेवताना हात स्वच्छ धुवून जेवावे
– टॅमीफ्लूची औषधे किंवा अनेक दिवसांपासून सर्दी, खोकला असल्यास आराम करावा; घराबाहेर पडू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)