पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
पुणे – अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांनी भाजपला शहराच्या विकासासाठी निवडून दिले असून या प्रक्रियेत प्रशासनावर अशा प्रकारे हल्ले हे योग्य नाहीत. त्यामुळे हा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रमुख नगरसेवकांची बैठक बोलाविली होती. यात या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने झालेला प्रकार लक्षात घेऊन सत्ताधारी म्हणून काय भूमिका असावी, यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. घडलेला प्रकार योग्य नाही. त्यामुळे अधिकारी वर्गात नाराजी असून याप्रकरणी लक्ष न दिल्यास भविष्यात अशा घटना वाढतील, तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होईल. त्यामुळे घडलेल्या घटनेप्रकरणी कोणावरही आरोप अथवा टीका न करता प्रशासनाला पाठींबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्याचे पत्र गुरुवारी महापालिका आयुक्तांना दिले जाणार असल्याचे भाजपमधील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.