पुणे – शाखा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी

पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील महाविद्यालयांना सूचना

पुणे – येत्या सन 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी, असे आदेश पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना बजाविले आहेत.

इयत्ता अकरावीतून बारावीत जाताना विविध कारणांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलायची असते. मात्र, महाविद्यालयांकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबावही टाकला जातो. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षण विभागाकडे अनेकदा तक्रारीही करण्यात येत असतात. काही विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे महाविद्यालय, शाखा बदलून मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार राऊत यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलण्यास मान्यता दिली आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मान्यता देणे आवश्‍यक
सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव राहात असलेल्या परिसरात महाविद्यालय बदलून मिळणे, शाखा बदलून मिळणे, विद्यार्थ्यांच्या राहण्याचा पत्ता बदलणे, बारावीसाठी शिक्षण मंडळ बदलणे अशा अनेक कारणांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलता येणार आहे. यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मान्यता देणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा बदलल्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माहितीमध्ये त्या सुधारणा करून घेण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयांनी करून घेणे बंधनकारक असल्याचे राऊत यांनी आदेशात नमूद केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)