पुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’

मुंबईतील दुर्घटनेनंतर महापालिकेला शहाणपण

पुणे – मुंबईतील सीएसएमटी येथील पादचारी पूलाचा स्लॅप कोसळल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील पादचारी पुलांचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुण्यातील पादचारी पुलांबाबत हा प्रश्‍न उद्‌भवणार नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे उपअभियंता संदीप पाटील यांनी याविषयी माहिती दिली.

शहरामध्ये नऊ पादचारी पूल आहेत. त्यामुळे या पुलांचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागीलवर्षी शहरातील उड्डाणपुलांचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्यात आले होते. परीक्षणानंतर करण्यात आलेल्या अहवालानुसार उडाणपुलांची दुरुस्ती, तर काहींची दुरुस्ती सुरू आहे. सध्या पादचारी पुलांसाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद नाही. त्यामुळे तरतूद उपलब्ध झाल्यानंतर पुढील कामाला सुरूवात करण्यात येईल. शहरातील काही पादचारी पूल जुने आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही, म्हणून पादचारी पुलांचे परीक्षण घेण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

लिफ्टची देखभाल दुरुस्ती आवश्‍यक
विश्रांतवांडी, डेक्कन महाविद्यालय, खडकी, भारती विद्यापीठ कात्रज, सारसबाग, कोकण एक्‍स्प्रेस हॉटेल शेजारी, डहाणूकर कॉलनी, एसएनडीटी महाविद्यालय याठिकाणी पादचारी पूल आहेत. त्यापैकी विश्रांतवाडी, डहाणूकर कॉलनी आणि कोकण एक्‍स्प्रेस हॉटेल येथे पादचारी पुलांवर नागरिकांच्या सोयीसाठी लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. परंतु सध्या त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. या लिफ्ट बंद असतात त्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती होणेही आवश्‍यक आहे. मात्र निधी नसल्याने तो मिळाल्यानंतर ही दुरुस्ती केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)