पुणे – ‘स्वच्छ 2020’साठी जोरदार तयारी

नियुक्‍त्या करून कामकाज व्यवस्थेच्या सूचना जारी

पुणे – स्वच्छ भारत अभियानाच्या 2019 च्या स्पर्धेत 37 व्या क्रमांकावर फेकले जाऊन नामुष्की पदरात पाडून घेतल्यानंतर पुणे महापालिकेने आतापासूनच कंबर कसली असून, शहर स्वच्छतेसंदर्भात आतापासूनच तयारी सुरू केली आहे. “मिशन 2020 – शून्य ते शंभर’ अशा मथळ्याखाली त्यांनी ही तयारीला सुरूवात केली आहे. तसे आदेशही अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहराने स्वच्छ शहरामध्ये पहिल्यावर्षी पाचाच्या आत म्हणजे दुसरे मानांकन मिळवले होते. त्यानंतर ते जे मागे गेले ते थेट 37 व्या स्थानावरच गेले. त्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे ऐनवेळी ही तयारी करण्याऐवजी आधीपासूनच जबाबदाऱ्या निश्‍चित करून तयारी करण्याचा निश्‍चय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. त्यानुसार शहराचे घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन टीमची पुनर्रचना करून प्रत्येकाला कामकाजाची सविस्तर रूपरेषा ठरवून देण्यात आली आहे.

प्रमुख, उप आरोग्यनिरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांना कामाच्या कक्षा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येकाने नेमून दिलेल्या कार्यकक्षेत ठरवून दिलेली कामे दैनंदिन स्वरूपात पार पाडायची आहेत असे या आदेशात नमूद केले आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे त्यांच्यावर परिमंडळ प्रमुखांचा अंकुश असणार आहे.

प्रमुख, उप आरोग्य प्रमुख यांच्या कामाच्या निश्‍चितीबरोबरच आर्थिक जबाबदारी, अंमलबजावणीबाबत इतर जबाबदारी, आरोग्य निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या, प्रशासकीय जबाबदारी अशी निश्‍चिती करण्यात आली आहे.

कारवाईचा अहवाल बंधनकारक
प्रत्येकाला रोज 15 केसेस दाखल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय रोज 50 नागरिकांकडून स्वच्छता ऍप डाऊनलोड करून घेऊन त्यांना ऍक्‍टीव्ह युजर बनवणे, दंड वसुलीची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, शौचास बसणे यापासून ते कचरा वर्गीकरण न करणे, बल्क वेस्ट जनरेटर्समध्ये कचरा प्रक्रिया प्रक्रल्प न राबवणे, मिळकत करात सवलत घेऊनही कचरा प्रक्रिया प्रकल्प न राबवणे, व्यावसायिक ठिकाणी लिटर बीन्स नसणे, कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे या विषयांचा समावेश आहे. तसेच रोजच्या रोज पाहणी करून या सर्वाचा रोजच्या रोज अहवाल सादर करणेही संबंधितांवर बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशासकीय जबाबदारी निश्‍चित करताना कर्मचाऱ्यांनी गणवेशात उपस्थित राहणे, मोकादम आणि अन्य कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती घेणे, रजिस्टर मेन्टेन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)