दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावे – सुप्रिया सुळे

दौंड – दौंड रेल्वे स्थानक सोलापूर ऐवजी पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्‍यक असल्याचे सुळे यांनी लक्षात आणून दिले. याशिवाय बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या मालकीच्या जमिनींचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सुळे म्हणाल्या की, दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी रोज दौंड ते पुणे हा प्रवास रेल्वेनेच करतात. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्‍न तातडीने सुटणे सोपे होणार आहे.

दौंड रेल्वे स्थानक पुणे शहरापासून आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. याठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा काही अनुषंगिक कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्‍य होते. त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

जमिनींबाबतच्या निर्णयाचा अधिकार…
रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर विकासकामे आणि योजना राबविण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना द्यावेत. रेल्वेच्या जागेवरील प्रस्तावित विकासकामे, स्थानकांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांचे प्रश्‍न, स्थानकालागत असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न यावर तातडीने निर्णय होणे आवश्‍यक आहे. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार नसल्याने ही कामे करण्यास विलंब होतो. त्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार दिल्यास कामे वेळेत मार्गी लागण्यास मदत होईल, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)