पुणे – राज्य परीक्षा परिषदेचा 52 कोटींचा अर्थसंकल्प

राज्य समितीपुढे बुधवारी ठेवणार मान्यतेसाठी


मंजुरीसाठी आचारसंहितेचा अडथळा येणार नाही

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा सन 2019-20 साठी 52 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी (दि.27) राज्य समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. शिलकी रक्कमेचा हा अर्थसंकल्प असणार आहे.

राज्य परीक्षा परिषद ही शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून 15 ऑगस्ट 2002 पासून ही स्वायत्त संस्था झालेली आहे. या परिषदेकडून विविध शासकीय परीक्षांची सर्व कामे करण्यात येतात. परीक्षार्थींकडून विविध परीक्षांसाठी प्राप्त होणारे परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क, विलंब शुल्क, दुय्यम गुणपत्रके, कार्यालयाकडील मुदत ठेवीवरील व्याज, रद्दी विक्री या माध्यमातून उत्पन्न मिळते. जमा होणारी एकूण रक्कम व वर्षभरातील विविध परीक्षा कामासाठी प्रत्यक्ष झालेला खर्च यांचे वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर वित्त समितीच्या सभेपुढे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या समितीत त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर कार्यकारी समितीनेही त्यास मान्यता दिली आहे. आता अंतिम मान्यतेसाठी राज्य समितीपुढे अंदाजपत्रक ठेवण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे.

सन 2015-16 मध्ये 43 कोटी 86 लाख रुपये जमा व 21 कोटी 69 लाख रुपये खर्च दाखविण्यात आला होता. त्यानंतर सन 2016-17 मध्ये 40 कोटी 26 लाख रुपये जमा व 23 कोटी 86 लाख रुपये खर्च नमूद करण्यात आला होता. सन 2017-18 मध्ये 57 कोटी 12 लाख रुपये जमा, तर 30 कोटी 6 लाख रुपये खर्च दाखविण्यात आला होता. राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अंदाजपत्रकाच्या मंजुरीला कोणताही अडथळा येणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

असा आहे जमा-खर्चाचा ताळमेळ
सन 2018-19 मध्ये 56 कोटी 94 लाख रुपये जमा व 39 कोटी 10 लाख रुपये खर्च दाखविण्यात आला होता. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतून 12 कोटी 50 लाख रुपये जमा झाले. मुदत ठेवींवरील व्याजातून 12 कोटी रुपये जमा झाले आहेत. डी.टी.एड., डी.एल.एड., संगणक टायपिंग, एनटीएस, एनएमएमएस या परीक्षांच्या शुल्कातून 32 कोटी रुपये जमा झाले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 12 कोटी 15 लाख रुपये, संगणक टायपिंगसाठी 10 कोटी रुपये, इतर परीक्षांसाठी 16 कोटी 95 लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. एकूण 17 कोटी 84 लाख रुपये एवढी अंदाजपत्रकातील रक्कम शिल्लक राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)