पुणे – मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रभावी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला बहुतांशी राजकीय पक्षही हातभार लावत आहेत. मात्र, असे असतानाच एसटी महामंडळाने मराठीच्या प्रचार आणि प्रसारालाच हरताळ फासला आहे. ई- तिकिटिंग मशीन्सच्या माध्यमातून तिकिटे लवकर मिळावीत. यासाठी चक्क इंग्रजीतूनच ती देण्यात यावीत, असा नवा फतवा महामंडळाने काढला असून त्याचे परिपत्रकही जारी केले आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना यापूर्वी छापील तिकिटे देण्यात येत होती. मात्र, एसटी महामंडळाने आपल्या कारभारात काळानुरुप बदल सुरु केला होता. त्यानुसार महामंडळाने हायटेकच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी प्रवाशांना तिकिटे देण्यासाठी महामंडळाच्या वतीने राज्यभरातील आगारांसाठी तब्बल 45 हजार ई-तिकिटिंग मशीन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. या मशीन्समुळे वाहकांचा भार कमी झाला आहे. मात्र, या मशीन्सच्या वापरानुसार त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय बिघाड झालेल्या मशीन्स बदलण्याची आवश्यकता आहे.
मात्र, महामंडळाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या मशीन्सच्या संदर्भात योग्य दक्षताच घेतलेली नाही. त्याचा परिणाम या यंत्रणेवर झाला आहे, या मशीन्समधून मराठीत तिकिटेच निघत नाहीत. ही तिकिटे निघाल्यास त्यावर अक्षरे पुसट येत असून या मशीन्स मध्येच बंद पडत आहेत, त्यावर महामंडळाने अभिनव उपाय शोधला आहे. त्यानुसार यापुढील कालावधीत इंग्रजीमध्येच तिकिटे देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यामुळे एसटी महामंड्ळाला मराठीचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.