एकाच रात्रीत सर्वच्या सर्व 34 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागातील सर्वच्या सर्व 34 कर्मचाऱ्यांच्या एकाच रात्रीत तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. येथील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कुजबुज सुरू होती. ही बाब वरिष्ठ पातळीवर चर्चीली गेल्यावर हा निर्णय घेण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभाग हा गुन्हे शाखेतील सर्वात जास्त वरकमाई असलेला विभाग मानला जातो. यामुळे येथे बदली होण्यासाठी तसेच कार्यरत असणारे बदली होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असतात. या बदल्यांमुळे मात्र पोलीस दलात खळबळ माजली असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.
प्रशासकीय “साफ सफाईला’ सुरवात
पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासकीय “साफ सफाईला’ सुरवात केली. त्याचाच एक भाग म्हणून बदल्या झाल्याची गुन्हे शाखेत चर्चा आहे. बदली झालेल्यांमध्ये कार्यकाल पूर्ण होत आलेल्यांबरोबरच नियुक्ती होऊन काही महिने झालेल्यांचाही समावेश आहे.
काहींच्या दुकानदारीचा फटका…
सामाजिक सुरक्षा विभागाचे कामकाज म्हणजे मुख्यता पीडित मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करणे, अनैतिक आणि अवैध धंद्यांवर कारवाई करणे आहे. शहरात एकेकाळी वेश्याव्यवसाय बुधवार पेठेत रेड लाईट एरिया पुरता मर्यादीत होता. तो आता शहराच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. मागील काही वर्षांत तर हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा विळखाच बसला आहे. या अगोदर काही कारवायांमध्ये अभिनेत्री, मॉडेल आणि परदेशी तरुणींची सुटका केली आहे. तर स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली गल्ली बोळात वेश्याव्यवसाय फोफावला आहे. त्या प्रमाणात कारवाया मात्र होताना दिसत नसल्याने हे पाऊल उचलले गेले असण्याची शक्यता आहे. बदली करण्यात आलेल्यांना प्रथम मुख्यालयात नेमणुकीची शिक्षा दिली होती. मात्र, पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता, त्यांची बदली विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या दुकानदारीचा फटका यातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही बदलीच्या रुपात बसला आहे.
पोलीस यंत्रणेतील कामाचा दर्जा आणि सुधारणा करण्यासाठी बदल्या केल्या गेल्या आहेत. या बदल्या नियमीत बदल्यांसारख्याच आहेत.
– के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त
कर्मचाऱ्यांचेही स्पा आणि मसाज सेंटर
पुणे पोलीस आयुक्तालयातील काही विभाग बंद करून तेथील कर्मचाऱ्यांना युनिटमध्ये वर्ग केल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा सर्वात मोठा निर्णय मानला जातो. गुन्हे शाखेत सर्वात जास्त वरकमाई असलेला विभाग म्हणून सामाजिक सुरक्षा विभागाकडे पाहिले जाते. यामुळे कारवाईपेक्षा वरकमाईवर जास्त लक्ष केंद्रित केले जात होते. अनेक कारवाया या दिखावा म्हणून किंवा हप्ते वाढवून मिळावेत यासाठी केल्या जात असल्याचा संशय वरिष्ठ पातळीवर होता. इतकेच नव्हे तर येथील दोन कर्मचाऱ्यांचे स्वत:चे स्पा आणि मसाज सेंटरही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच सहा भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या एका दिवसात बदल्या करण्यात आल्या. पुणे पोलिसांच्या व्हॉटस् ऍपवर पोलिसांच्या कार्यपध्दतीबद्दल तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यावरही सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांबद्दल तक्रारी करण्यात येत आहेत. याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जात आहे. व्हॉटस् ऍपवर आलेल्या तक्रारींवरूनच यातील काही कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. यापुढे भ्रष्ट व सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा न देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर करडी नजर असणार आहे.