पुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी

पुणे – पुणे शहराच्या जुन्या हद्दीतून निर्माण करण्यात येणाऱ्या सुमारे 35 कि.मी.च्या हाय कपॅसिटी मास ट्रान्झीट रुट (एचसीएमटीआर) उन्नत रिंगरोडच्या कामासाठी चीनच्या कंपनीसह सात कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे.

यापैकी तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी महापालिका भवन येथे आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्री-बीड बैठकीला उपस्थिती लावली होती, तर उर्वरीत कंपन्यांनी काही तांत्रिक कारणांबाबत महापालिकेकडून स्पष्टीकरण मागविले आहे, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून सुमारे 35 कि.मी.चा “एचसीएमटीआर’ मार्ग तयार करण्यात येणार आहे. संपूर्णत: उन्नत असलेल्या या मार्गावर सहापदरी रस्ता असून, त्यापैकी दोन मार्गिका या बीआरटीसाठी असतील. या मार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी 27 ठिकाणी रॅम्प असतील. या प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. हा प्रकल्प खाजगी सहकार्यातून उभारण्यात येणार असून, महापालिकेने विविध पर्यायांचा अभ्यास करून “हॅम’ आणि “डीबीएओटी’ असे दोन पर्याय अंतिम करून इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले होते. यासाठीची प्री-बिड मीटिंग बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये एल ऍन्ड टी, जे कुमार, वेलस्पन या कंपन्यांनी त्यांच्या प्रस्तावांचे सादरीकरण केले. तर एका चायनीज कंपनीसह नोएडा आणि मुंबईतील चार कंपन्यांनी महापालिकेला ई-मेलद्वारे हा प्रकल्प उभारणीची तयारी असल्याची तयारी दाखवली आहे. मात्र, काही तांत्रिक बाबींबाबत स्पष्टीकरणही मागविले आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)