पुणे – महापालिकेच्या आर्थिक तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या स्थायी समितीचे सदस्यपद मिळविण्यासाठी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच लागणार आहे. समितीमधील कार्यकाल संपणाऱ्या 8 सदस्यांमध्ये भाजपचे 6 सदस्य असून या पदावर वर्णी लागण्यासाठी भाजपच्या सुमारे 80 हून अधिक नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांचा कार्यकाल संपणार असून या जागांसाठी राष्ट्रवादीच्या 21 जणांची पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे.
स्थायी समितीच्या 8 सदस्यांची मुदत दि.28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असून त्यात भाजपच्या 6 सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांची जागी नवीन सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारीच्या मुख्यसभेत केली जाणार आहे. तर मुदत संपणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांचाही समावेश आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडे स्थायी समितीची सूत्रे आहेत. 16 सदस्यांच्या समितीमध्ये भाजपचे 10 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 तर शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य आहेत. त्यातील 8 सदस्यांचा 2 वर्षांचा कार्यकाल येत्या दि.28 फेब्रुवारीला मुदत संपत आहे. यात भाजपचे 6 सदस्य भाजपचे असून त्यात सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, नीलिमा खाडे, कविता वैरागे, राजा बराटे तसेच आबा तुपे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सदस्यांची नियुक्ती दि.20 फेब्रुवारीच्या मुख्यसभेत केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आपल्या पक्षातील इच्छूक सदस्यांकडून नावे मागविण्यात आली होती.
कोणाला संधी मिळणार?
भाजपमधून इच्छुकांचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याने अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, हे मुख्यसभेत या सदस्य नियुक्त झाल्यानंतरच समोर येणार आहे. त्यातच, समितीत एक वर्ष पूर्ण होणारे भाजपचे समिती सदस्यही अध्यक्षपदासाठी जोर लावण्याची शक्यता असल्याने मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन कोणाला संधी देणार याबाबतही पालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.