पुणे – अतिरिक्‍त भत्ते बंद करण्यावर शिक्‍कामोर्तब

विद्यापीठाचा निर्णय: 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्‍त दिले जाणारे भत्ते बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. त्यानुसार कार्यवाही करीत विद्यापीठामार्फत येत्या 1 एप्रिल 2019 पासून अतिरिक्‍त भत्ते बंद करण्याची अंमलबजावणी होणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केल्याने अतिरिक्‍त भत्ते बंद होण्याच्या निर्णयावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्‍त दूरध्वनी भत्ता, वाहनभत्ता, सुपरवायझरी भत्ता, परीक्षा विभागात काम करण्याचा गोपनीय भत्ता आदी असंख्य भत्त्यांची खैरात केली जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या निधीअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनांचा एकत्रित आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने या भत्त्यांची पडताळणी केली असता यातील अनेक भत्ते अतिरिक्‍त ठरत असून, ते बंद करण्याची शिफारस केली. ही शिफारस व्यवस्थापन परिषदेने मान्य केली. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शनिवारी काढले. या परिपत्रकाचा संदर्भ लक्षात घेता अतिरिक्‍त भत्त्यावर पायबंद बसणार आहे.

गोपनीय कामकाजासाठी भत्ते बंद
ज्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे, त्याच कामासाठी त्यांना पुन्हा अतिरिक्‍त भत्ते देणे नियमबाह्य असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. गोपनीय कामकाजासाठी देण्यात येणारे मानधन, गुणपडताळणी व पूनर्मूल्यांकनाचे काम जलदगतीने करण्यासाठी असलेल्या योजनेतील प्रोत्साहनपर मानधन, यासंदर्भातील सर्व ठराव व्यवस्थापन परिषदेने रद्द केले आहेत. त्यामुळे या सेवकांना कोणतेही अतिरिक्‍त भत्ते दिले जाणार नसल्याचे कुलसचिव डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

दैनंदिन कामकाजासाठी भत्ते बंद
शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना आयोजित विभागीय अथवा आंतरविभागीय समित्यांच्या कामकाजासाठी कोणतेही भत्ते नसतील. तसेच विद्यापीठाने आयोजित शिबिरांमध्ये पार पाडले जाणारे काम हे दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. त्यासाठी वेगळा भत्ता नसेल. चर्चासत्र, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम हा दैनंदिन कार्यक्रम असून, त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना त्यांच्या आयोजन व व्याख्यानासाठी मानधन दिले जाणार नाही.

बायोमेट्रिक उपस्थिती, तरच भत्ता
विद्यापीठातील शिक्षक व सेवकांची कर्तव्ये पार पाडताना कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ केलेल्या कामासाठी शिक्षकेतर सेवकांना भत्ता दिला जाईल. मात्र, असा भत्ता बायोमेट्रिक उपस्थिती अहवालावरून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासंबंधीची कार्यपद्धती, कालावधी व प्रति तासाचे दर इत्यादी संबंधांची नियमावली प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.

अतिरिक्‍त भत्ते बंद; पण कुटुंब कल्याण भत्त्यात वाढ
एकीकडे अतिरिक्‍त भत्ते बंद केले. याउलट शिक्षकेतर सेवकांना पडणारा कामाचा अतिरिक्‍त भार विचारात घेता, शिक्षकेतर सेवकांच्या सध्याच्या कुटुंबातील कल्याण भत्त्याच्या रकमेत वाढ करीत विद्यापीठाने सेवकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी शिक्षकेतर सेवकांच्या एका महिन्याच्या मूळ वेतनाएवढी किंवा 15 हजार यापैकी जे जास्त असेल, ती रक्‍कम सेवकांना प्रतिवर्ष एप्रिल महिन्यात देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)