पुणे -‘आरटीई’च्या शाळा प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडले

विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर

पुणे – राज्य शासनाच्या वतीने बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’ अंतर्गतच्या 25 टक्‍के आरक्षित विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शिक्षण विभागाने तयार केलेले वेळापत्रक कोलमडले आहे. वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शाळांच्या नोंदणी व पालकांच्या ऑनलाइन अर्जांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला असून प्रक्रिया आणखी लांबणीवर पडत चालली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षीप्रमाणे यंदाही “आरटीई’च्या शाळाप्रवेशांची प्रकिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान यांनी 8 फेब्रुवारीला आरटीईच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार प्रवेशपात्र शाळांच्या नोंदणीसाठी व नोंदणीची पडताळणी करण्यासाठी 8 ते 22 फेब्रुवारी अशी 15 दिवसांची मुदत निश्‍चित करण्यात आली होती. पालकांना मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी ते 11 मार्च, अशी 15 दिवसांची मुदत ठरविण्यात आलेली होती. पहिली सोडत 14 व 15 मार्चला काढण्याबाबतही वेळापत्रकात नमूद करण्यात आले होते. “आरटीई’च्या पोर्टलवर सर्व ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शासनाकडून “आरटीई’ प्रवेशपात्र शाळांसाठी अटी व शर्ती लागू केलेल्या आहेत. यात अनेकदा बदलही करण्यात आलेले आहेत. अटी व शर्ती जाचक वाटत असल्याने बहुसंख्य शाळांकडून “आरटीई’ प्रवेशासाठी फारसा उत्साह दाखविण्यात येत नाही. गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून “आरटीई’ प्रवेशाचे शुल्क परतावा अथवा निधी शासनाकडून शाळांना अदाच करण्यात आलेला नाही. शाळांच्या विविध संघटनांनी शासनाकडे अनेकदा प्रलंबित निधी मिळावा यासाठी मागणी केली आहे. “शाळा बंद’ सारखी अनेक आंदोलनेही केली आहेत. काही संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे.

विविध कारणांमुळे अद्याप पोर्टलवर “आरटीई’च्या प्रवेशासाठी शाळांकडून फारशी नोंदणीच करण्यात आलेली नाही. यात नवीन व जुन्या अशा दोन्ही शाळांचा समावेश आहे. शाळांकडून नोंदणीसाठी प्रतिसाद मिळावा यासाठी आता मुदतवाढ देऊन वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार शाळांना नोंदणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याच कालावधीत नोंदणी केलेल्या माहितीची पडताळणीही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पालकांना मुलांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 5 मार्चपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अंतिम मुदत 22 मार्चपर्यंत राहणार आहे. यानंतर सोडत काढण्यात येणार असून मुलांचे प्रवेश निश्‍चित करण्यात येणार आहे.

आधिकारीच कार्यालयातून गायब…
प्राथमिक शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने प्रवेश प्रक्रिया राबविली जात नसल्यानेच वेळापत्रक कोलमडण्याची वेळ ओढावली आहे. अधिकारी सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी कार्यालयातून गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळते. न्यायालयीन प्रकरणे, बैठका, मंत्रालय वारी यातच अधिकारी जास्त गुंतल्याची कारणे कार्यालयातून सतत सांगण्यात येतात. अधिकारीच कार्यालयात उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. यामुळे कामे रखडण्याचे प्रकारच जास्त घडू लागली आहेत. या कारभाराबाबत शैक्षणिक संस्था, पालक, संघटना यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)