पुणे – महसूल कर्मचारी ‘ऑन ड्युटी’ 22 तास

महसूल विभागातील सुमारे चार हजार जणांची होती नियुक्‍ती

पुणे – जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी पार पडली. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने महसूल विभागातील सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

मतमोजणीच्या दिवशी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी गुरुवारी पहाटे 5 वाजता मतमोजणी केंद्रांवर हजर झाले. प्रत्यक्ष मतमोजणी आणि मतमोजणीनंतर करावयाची पुढील कागदोपत्री पूर्तता तसेच पुन्हा ईव्हीएम मशीन सीलबंद करण्याची प्रकिया ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी निवडणुक कर्मचारी – अधिकारी यांना शुक्रवारी पहाट उजाडली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही सर्व कामे पूर्ण झाली. मतमोजणीच्या दिवशी महसूल कर्मचारी ऑन ड्युटी 22 तास कार्यरत असल्याचे दिसून आले.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाकडे जबाबदारीने पाहिले जाते. निवडणुकीच्या कामाला प्रशासनही प्राधान्य देते. मतदानाबरोबर मतमोजणीचे काम ही आव्हानात्मक असते. मतमोजणीच्या वेळी ईव्हीएमची मतमोजणी केली जाते. यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या सर्व प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक देखरेख ठेवतात.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे तर शिरूर आणि मावळ मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडासंकूल येथे झाली. मतमोजणीसाठी नियुक्‍त करण्यात आलेले कर्मचाऱ्यांना गुरुवारी पहाटे 5 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तत्पूर्वी कोणत्या विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार विधानसभा नियुक्तीचे आदेश या कर्मचाऱ्यांना हजर होते वेळी देण्यात आले. त्यानंतर सकाळी 7 वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित ईव्हीएम ठेवण्यात आलेली स्ट्रॉगरूम उघडण्यात आली. प्रत्यक्ष मतमोजणीच्या कामास सकाळी 8 वाजता सुरुवात करण्यात आली. एका बाजूला टपाली मतदान तर दुसऱ्या बाजूला ईव्हीएममधील मतांची मोजणीचे काम सुरू होते.

मतमोजणीच्या सुमारे 22 ते 32 फेऱ्या होत्या. एका फेरीसाठी 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागत होता. साधारणपणे काही मतदारसंघात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममधील मतांची मोजणी पूर्ण झाली. यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करून ती ईव्हीएममधील मतांशी पडताळून पाहण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर करून विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. ही प्रक्रिया एवढ्यावरच न थांबता त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याचा अहवाल निवडणुक आयोगाला सादर करण्यात आला. तसेच ईव्हीएम पुन्हा सीलबंद करण्याचे काम सुरू झाले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्रवारचे पहाटेचे 3 वाजले. मतमोजणीच्या कामासाठी महसूल कर्मचारी तब्बल ऑन ड्युटी 22 तास कार्यरत राहिले असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)