पुणे – पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल गुरूवार, दि. 16 मे रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ह्या सर्व परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा मार्फत घेण्यात येतात. शाळांना ह्या परीक्षेचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुडपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉग-इनमध्ये दि. 16 ते 27 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता 50 रुपये शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 27 मे पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे दिली.