पुणे – शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर

माहिती अपडेट करणे सुरू होणार : तब्बल सव्वा वर्षांचा लागला कालावधी

पुणे – राज्यात जानेवारी 2018 पासून तांत्रिक अडचणीमुळे बंद पडलेले शालार्थ प्रणालीचे काम पूर्ववत करण्याची जबाबदारी महा आयटी कडे सोपविण्यात आली होती. आता या प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता या प्रणालीत माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू करता येणार आहे.

शालार्थ प्रणालीत ऑगस्ट 2017 मधील माहिती उपलब्ध आहे. ऑगस्ट 2017 ते एप्रिल 2019 पर्यंतच्या कालावधीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये बदल झालेले आहेत. काही शिक्षकांच्या इतर शाळांमध्ये बदल्या झाल्या आहेत. काही शिक्षकांची सेवानिवृत्ती अथवा इतर कारणामुळे सेवा समाप्ती झाली आहे.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नुकताच सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रणालीत बदल करणे आवश्‍यक आहे. मात्र, यापूर्वी सहाव्या वेतन आयोगामध्ये घेतलेल्या शेवटच्या वेतन देयकाचा तपशील भरणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद स्तरावर गटशिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिका स्तरावर प्रशासन अधिकारी अथवा शिक्षण प्रमुख, खासगी प्राथमिक व माध्यमिक, डी.एड.महाविद्यालय, सराव पाठशाळा स्तरावर वेतन पथकाचे अधीक्षक यांच्यावर कर्मचाऱ्यांची माहिती अंतिम करुन अपडेट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

महा आयटी कडून आवश्‍यक ते बदल करण्यात आल्यानंतर खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील नवीन शिक्षक संबंधित स्तरावरुन शालार्थ प्रणालीत समाविष्ट करणे, नवीन पद समाविष्ट करणे, नवीन शाळा समाविष्ट करणे आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याबाबत सर्व संबंधितांना स्वतंत्र पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे आदेशही आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी अथवा शिक्षण प्रमुख, बृहन्मुंबईचे शिक्षण निरीक्षक आदींना बजाविले आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर काम लवकरच
शालार्थ प्रणालीतील अडथळे दूर झाल्यानंतर आता प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यात पुढील टप्प्यातील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. माहिती भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्याबाबत सविस्तरपणे ई-मेलद्वारे कळविण्यात यावे, अशा सूचना शिक्षण आयुक्‍त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)