पुणे – पंचवीस वर्षांपूर्वीचे राठी हत्याकांड : घटनेवेळी अल्पवयीन, आरोपीची याचिका

सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे – पंचवीस वर्षांपूर्वी शहरासह संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या राठी हत्याकांडात फाशी सुनावण्यात आलेल्या आरोपीने घटनेवेळी तो अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने घटनेवेळी त्याचे वय नेमके किती होते, याबाबत शहानिशा करून त्याचा अहवाल सहा आठवड्यात सादर करण्याचे निर्देश पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची पुणे जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बचाव पक्षाकडून अॅड. हर्षद निंबाळकर यांनी वकिलपत्र दाखल केले आहे. त्यांना अॅड. राहुल देशमुख, अॅड. ऋषी घोरपडे, अॅड. शिवम निंबाळकर मदत करत आहेत. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार कामकाज पाहणार आहेत. राठी हत्याकांडप्रकरणी जितेंद्र गेहलोत आणि नारायण चौधरी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर राजू राज पुरोहित हा आरोपी या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला होता. गेहलोत आणि चौधरी या दोघांची सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवली होती. त्यानंतर दोघांनी दयेसाठी केलेला अर्ज 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळला होता. दरम्यान, फाशीच्या शिक्षेच्या या प्रकरणाचा केस स्टडी म्हणून अभ्यास करत असलेल्या दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नारायण चौधरी हा घटनेच्यावेळी विधीसंघर्षग्रस्त असल्याचा शोध घेतला. त्याबाबतची काही कागदपत्रे गोळा केली.

चौधरीच्या वयाचा मुद्दा उपस्थित करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. तसेच त्याच्यातर्फे कामकाज पाहण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चौधरीच्या वयाच्या मुद्द्याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांना सहा आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर जेलमध्ये असलेला आरोपी चौधरीला बुधवारी पुणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. चौधरीच्या वयाचा मुद्दा सिद्ध करणारी एकूण अकरा कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करण्यात आली. यात त्याचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत दाखला, ससून हॉस्पिटलचा त्याच्या वयासंदर्भातील अहवाल याचा समावेश आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी कोथरुड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना एक आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार ते राजस्थानला रवाना झाले आहेत. घटनेवेळी चौधरीचे वय साडेबारा होते, हे सिद्ध करणारी कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. एक मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी दररोज होणार आहे, असे ऍड. निंबाळकर यांनी सांगितले.

वयाचा मुद्दा इतक्‍या उशीरा उपस्थित कसा?
आरोपी चौधरीला तो घटनेवेळी विधीसंघर्षग्रस्त होता याचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्याला कायद्याची माहिती नव्हती. त्याच्या फाशीची शिक्षा रद्द करण्याचा दया अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याच्या वयाचे पुरावे उपलब्ध झाले. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका दाखल करून त्याच्या वयाचा मुद्दा स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. राठी हत्याकांडात चार महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. ऑक्‍टोबर-1994 मध्ये घडलेल्या घटनेबाबत फेब्रुवारी-1998 मध्ये पुणे जिल्हा न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)