पुणे – महामार्गांवरील “पंक्‍चर्स’ बंद होणार

अपघात घटणार : रस्ता सुरक्षा समितीचे आदेश

पुणे – शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल आदींसाठी महामार्गाच्या दुभाजकातून (डिव्हायडर) अनधिकृतपणे तयार केलेले मार्ग (पंक्‍चर्स) तत्काळ बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.

शहराच्या विस्तारीकरणाबरोबरच हद्दीलगत असलेले महामार्गही शहराचा एक भाग बनले आहेत. शहरातून पुणे-मुंबई, बंगळुरू, सोलापूर, सातारा आणि नगर महामार्ग जातात. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्याची दुरवस्था आदींमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच हॉटेल, पेट्रोलपंप चालकांनी आपल्या सोयीनुसार दुभाजक फोडून मार्ग बनवले आहेत. यामुळे अनेक वाहने येथून वळणे घेतात. परिणामी, महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांचा वेग पाहता या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे अशा प्रकारचे अनाधिकृत वळणे (पंक्‍चर्स) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रस्ते बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाला दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी क्रेन उपलब्ध होणार
महामार्गावर वाहनांचा अपघात झाल्यास काही क्षणात क्रेनच्या सहाय्याने ही वाहने रस्त्याच्या बाजूला काढणे अपेक्षित आहे. मात्र, यासाठी आवश्‍यक असलेल्या क्रेनची संख्या अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे उपलब्ध क्रेन व अपेक्षित क्रेन याबाबतचा अंदाजपत्रकीय अहवाल समितीस सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)