पुणे – डाळींनाही दुष्काळाचा तडाखा

आवक होतेय कमी : भाववाढीची भीती


10-30 टक्‍के सर्व डाळींच्या भावांतील दहा दिवसांतील वाढ

पुणे – दुष्काळाचा परिणाम डाळींच्या आवकवर झाला आहे. दरवर्षी जानेवारीत डाळींची आवक सुरू होती. मात्र, यंदा फेब्रुवारी उजडला तरीही अपेक्षित मागणी होत नाही. त्यामुळे डाळींच्या भावात दहा दिवसांत सुमारे 10 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. अशातच अन्नधान्य आणि मसाला बाजारावरील नियमन हटवल्यामुळे बाजार समितीच्या आत कडधान्ये, डाळी आणण्याची गरज उरली नाही. त्यामुळे कडधान्य आणि डाळींचे भाव आणखी वाढतील, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

तूर डाळीविषयी व्यापारी ओम राठी म्हणाले, “गेल्या वर्षी देशभरात डाळींच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली होती. यामध्ये तूरडाळीचे प्रमाण सर्वांत जास्त होते. याखेरीज सरकारकडेही मोठ्या प्रमाणात शिल्लक साठा असल्याने डाळींचे भाव आवाक्‍यात होते. यंदा राज्यासह देशातील डाळ उत्पादक क्षेत्रांमध्ये कमी पावसासह दुष्काळ पडल्याने लागवडीमध्ये सर्वाधिक जवळपास 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यामध्ये, राज्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या तूरडाळीचाही समावेश आहे.’

व्यापारी अल्पेश सिसोदिया म्हणाले, “व्यापाऱ्यांकडे कडधान्य, डाळींचे साठे कमी आहेत आणि त्यातच लहरी हवामानामुळे यावर्षी पिकांना फटका बसला आहे. बाजारात डाळींचा पुरेसा साठा नसून दिवाळीनंतर कडधान्य, डाळींची मागणी वाढत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडेच माल नसल्याने बाजारात आवक घटली आहे. हे प्रमाण हळूहळू वाढण्याची शक्‍यता असल्याने व्यापारी धास्तावले आहेत. बाजारात माल आला नाही, तर सर्व गणिते बिघडण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर डाळींच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे डाळींचा तुटवडा जाणवण्याची दाट शक्‍यता आहे.’

बाजारात तुरडाळींच्या जुन्या डाळींसह नव्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात तूरडाळींच्या भावात दहा दिवसांमध्ये 400 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्याच्या तुरडाळींच्या तुलनेत जुन्या डाळींचे भाव प्रतिकिलोमागे 6 ते 7 रुपयांनी कमी निघाले आहेत. तर, अन्य सर्व डाळींच्या भावात 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे.
– ओम राठी, डाळींचे व्यापारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)