पुणे – त्रासदायक डास शोधणे शक्‍य; ‘मॉस्किटो डिटेक्‍टर’ यंत्र

लष्करी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून विकसीत

पुणे – एरव्ही माणसांचा चावा घेऊन त्यांना जेरीस आणणाऱ्या डासांमुळे विविध प्रकारच्या साथीचे रोग पसरतात. अशावेळी परिसरातील डासांना सरसकट मारले जाते. मात्र, अनेकदा अशा रोगांना कारणीभूत असणाऱ्या डासांऐवजी चुकीच्या प्रजतीतील मच्छर मारले जातात. त्यातून मूळ समस्या मात्र कायम राहाते. अशावेळी अपायकारक डासांना ओळखून त्यांना प्रतिबंध करता आला तर?.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या आसपास घोंगावणाऱ्या शेकडो मच्छरांमधून केवळ डेंग्यू-मलेरिया यासारख्या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांना ओळखणे ही अतिशय किचकट बाब असते. मात्र, पुण्यातील लष्करी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी या समस्येवर उपाय शोधत रोगांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची ओळख पटविणारे “मॉस्किटो डिटेक्‍टर’ यंत्र निर्माण केले आहे. त्यामुळे अशा डासांना ओळखून, त्यांचा प्रतिबंध करण्यास मोठी मदत मिळणार आहे.

संस्थेतील इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि टेली कम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षांत शिकणारे सौरभ सिंग आणि निधी यादव यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. जी. आर. पाटील, संचालक ब्रिगेडीयर अभय भट तसेच सॅन फ्रान्सिस्को येथील एका संशोधन संस्थेने यासाठी मदत केली. जगभरातील 1 लाख डासांच्या प्रजातींचा डाटाबेस अभ्यासल्यानंतर हे उपकरण तयार करण्यात आले आहे. नुकतेच उपराष्ट्रपती वैंकेया नायडू यांच्या हस्ते या उपक्रमाला “छात्र विश्‍वकर्मा’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय राबविणे शक्‍य
याबाबत सौरभ आणि निधी म्हणाले, “या उपकरणाच्या माध्यमातून डासांच्या प्रजाती, त्यांचे लिंग ओळखणे सहजपणे शक्‍य होते. याच्या माध्यमातून मलेरीया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, एलिफन्टायसिस यासारख्या रोगांना कारणीभूत ठरणारे डास तत्काळ ओळखून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्‍य होते. लष्करासोबतच नागरी प्रदेशातील वापरासाठीदेखील हे यंत्र उपयुक्त असून, याच्या माध्यमातून कोणत्या परिसरात कोणत्या प्रकारच्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, याबाबत देखरेख ठेवून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय राबविने शक्‍य होणार आहे.’

‘अशाप्रकारचे डासांची ओळख करणारे हे देशातील पहिलेच उपकरण आहे. सध्या हे प्रायोगिक स्तरावर असून, याची अचूकता तब्बल 75 टक्‍के आहे. या उपकरणाची अचूकता वाढविण्यासोबतच त्याचा व्यावसायिक उपकरण म्हणून वापरासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
– डॉ. जी. आर. पाटील, विभागप्रमुख

अशाप्रकारे काम करते “मॉस्किटो डिटेक्‍टर’ :
ज्या परिसरात हे यंत्र बसविले जाते, त्या परिसरातील मच्छरांना यंत्रात शोषून घेते. यंत्रामध्ये बसविण्यात आलेले दोन मायक्रोफोनपैकी एक आसपासचा आवाज बंद करते तर दुसरा मायक्रोफोन या मच्छरांच्या हालचालींचा आवाज “कॅप्चर’ करते. यंत्रामधील आधीच देण्यात आलेल्या माहितीतून त्या मच्छरांची नेमकी प्रजाती, लिंग कोणते याची ओळख पटविली जाते. त्यानुसार मच्छर घातक आहे की नाही, असेल तर त्यापासून कोणता धोका आहे याची माहिती या यंत्राद्वारे देण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)