पुण्याचा निकाल आश्‍चर्यकारक असेल – मोहन जोशी

पुणे – पुणे लोकसभेची निवडून ही धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी असून सुज्ञ पुणेकर जनशक्तीलाच पाठींबा देतील. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्‍चित असल्याचा दावा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच आपल्या बाबत पुणेकरांमध्ये आपूलकीची भावना असून मतपेटीतून पुणेकर आश्‍चर्यकारक निकाल देतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शरद रणपिसे, उल्हासदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंक़ुश काकडे, माजी आमदार दिप्ती चवधरी यांच्यासह कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आघाडीतील घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, “कॉंग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला असला, तरी प्रचाराचे 2 टप्पे जवळपास पूर्ण झाले आहेत. या प्रचारानिमित्त शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील नागरिकांशी संवाद साधता आला. त्यांच्यात जाऊन आपली भूमिका मांडता आली. यावेळी जो प्रतिसाद मिळाला, तो अनपेक्षित होता. त्यावरून पुणेकरांचा “मूड’ हा परिवर्तनाचा असून ही निवडणूक पूर्णत: कॉंग्रेसच्या हातात आली आहे. तसेच या सर्व प्रचारादरम्यान आघाडीच्या घटकपक्षांनी दाखविलेले संघटन आणि नियोजनामुळे प्रचाराता एकसंघपणा राहिल्याचा दावा जोशी यांनी यावेळी केला.
पुणे शहराने गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपला सत्ता दिली. मात्र, त्यांच्याकडून केवळ भ्रष्टाचारच केला गेला. हीच भ्रष्टाचाराची धनशक्ती आता या निवडणुकीसाठी वापरली जात असून ही आता धनशक्तीविरोधातील जनशक्तीची लढाई बनली आहे, से जोशी म्हणाले.

बापट हे विकासाचे “स्पीड ब्रेकर’
जोशी यांनी यावेळी बापट यांच्यावर जोरदार टीका केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जवळपास 25 वर्षे आमदार असताना, बापट यांनी शहराच्या विकासात केवळ “स्पीड ब्रेकर’ची भूमिका निभावली, अशी टीका त्यांनी केली. स्मार्ट सिटी, पुण्याच्या आधी सुरू झालेली नागपूर मेट्रो, शहराची पाणी समस्या, गणेश मंडळ कार्यकर्त्यांवरील गुन्हे, पूरग्रस्त वसाहतीचा प्रश्‍न, एसआरएचा प्रश्‍न, नदी सुधारणा अशी अनेक कामे केवळ त्यांच्यामुळे खोळंबली आहेत. त्यामुळे पुणेकर हे कधीच विसणार नाहीत. या पूर्वीही पुणेकरांनी चांगले काम न केल्याने भाजपच्या तीन खासदारांना पाच वर्षानंतर पुन्हा घरी बसवले आहे. त्यामुळे या वेळी पुण्यात परिवर्तन अटळ असल्याचा दावा जोशी यांनी केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)