पुणे – कारवाईविरोधातील पोलीस तक्रार खोटी

गुन्हा दाखल करण्याच्या आदेश : महापालिका अपिलात जाणार

पुणे – सिंहगड रस्त्यावरील पर्वती जलशुद्धीकरण केंद्रालगत असलेल्या अनधिकृत पथविक्रेत्यांवर केलेल्या कारवाईविरोधात पोलिसांत जी तक्रार दाखल केली आहे, ती सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे. ही तक्रार खोटी असून याबाबत महापालिका प्रशासनामार्फत दाद मागण्यात येणार असून, तक्रारदारांच्याच विरोधात पोलीसांत तक्रार देण्यात येणार असल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिकेने नेमलेल्या तपासणी पथकाद्वारे सार्वजनिक रस्ता, पदपथांवरील फेरीवाल्यांची तपासणी करण्यात येत आहे. बहुतांश ठिकाणी हे फेरीवाले रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजवणे, गॅस सिलेंडरचा वापर करणे, प्रमाणपत्रधारकाने स्वत: व्यवसाय न करणे किंवा सदरचा व्यवसाय इतरांना चालवण्यास देणे आदी प्रकार करून व्यवसाय प्रमाणपत्रातील अटी शर्थींचा भंग करत आहेत. अशांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे.

सिंहगड रस्त्यावर पर्वती जलशुद्धीकरण केंद्राजवळही कारवाई करण्यात आली. मात्र, त्या कारवाईविरोधात दरोडा टाकल्याची तक्रार बालाजी वायकर आणि इतरांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली. या हातगाड्या अनधिकृत, बंद अवस्थेतील आणि कोणतेही प्रमाणपत्र दर्शनी भागात लावले नसल्याने उचलण्यात आल्या होत्या. त्यावेळी पैशांचा गल्ला किंवा पैसे घेण्यात आले नाहीत. त्या उचलल्यानंतर वायकर यांनी त्या गाडीबाबत कोणतेही कागदपत्र सादर केले नव्हते. त्यांनी दाखल केलेली तक्रार पूर्णपणे खोट्या स्वरूपाची होती असे, जगताप यांचे म्हणणे आहे.

महापालिका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची बदनामी आणि मानहानीबद्दल संबंधित पोलीस ठाण्यात वायकरांविरुद्ध बदनामीची तक्रार दाखल करणार असल्याचे जगताप यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here