पुणे – महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळाकडून राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील विविध विद्याशाखांच्या पीएच.डी. प्रवेशासाठी येत्या 10 ऑगस्ट रोजी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 20 मे ते 7 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत.
या प्रवेश परीक्षेसाठी संबंधित विद्या शाखेचे पदव्युत्तर व सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम पदव्युत्तर परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहणार आहेत. परीक्षेसाठी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर अर्ज भरावे लागणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्यासाठी 21 मे ते 11 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थिनी संपूर्ण माहितीपत्रक वाचणे गरजचे आहे. अर्ज भरल्यानंतर ते परीक्षा मंडळाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. संभाव्य पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 25 जून रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र 1 ऑगस्टपासून संकेतस्थळावरून प्रिंट काढून घेता येणार आहे.
उत्तराची नमूना पत्रिका 19 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 22 ऑगस्ट रोजी लावण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली आहे.