पुणे – पीएच.डी अभ्यासक्रम शिष्यवृत्ती; आजपासून अर्जभरणा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयातील पीएच.डी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न जे. आर.डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास उद्यापासून (दि.30) लिंक खुली होत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 8 एप्रिलपर्यंत आहे.

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे नियम व अटी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने आज प्रसिद्ध केले. नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी योजनेस पात्र असणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातील पीएच.डी.साठी दोन विद्यार्थी किंवा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या 50 टक्‍के यापैकी जे कमी असेल, त्यांना तीन वर्षे कालावधीसाठी प्रतिमहिना 6 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शिष्यवृत्ती योजनेसाठी महाविद्यालयाने शिफारस केलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून “भारतरत्न जे.आर.डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजना’ या लिंकवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे. अर्जासाठी लिंक 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत खुली राहील. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत कागदपत्रासह आणि मार्गदर्शक व विभागप्रमुख यांच्या शिफारशीसह दि. 10 एप्रिलपर्यंत शैक्षणिक प्रवेश विभागात प्रत्यक्ष सादर करणे आवश्‍यक आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)