पुणे – एमआयडीसीच्या करवसुलीला ग्रामपंचायतींचा विरोध

29 ग्रामपंचायतींनी नोंदविल्या हरकती, आक्षेप

पुणे – राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींचे घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करवसुलीचे अधिकार आता एमआयडीसीकडे देण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, 29 ग्रामपंचायतींनी या करवसुलीच्या अधिकाराबाबत आक्षेप नोंदविले आहेत.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतची अधिसूचना 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध केली आहे. या अधिसुचनेनुसार ग्रामपंचायत करवसुलीच्या नवीन नियमांबाबतचा कच्चा मसुदा तयार केल्याचे सांगण्यात आले. या नव्या मसुद्यात एमआयडीसी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींकडे असलेले करवसुलीचे अधिकार काढून घेऊन ते एमआयडीसीकडे देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामसभा, पंचायत समिती आणि प्रसंगी जिल्हा परिषदेचेही ग्रामपंचायत करवसुलीबाबत असलेले अधिकार संपुष्टात येणार आहेत.

एमआयडीसीने कर वसूल केल्यानंतर त्यातील निम्मी रक्कम गावांच्या विकासासाठी वापरावी आणि निम्मी रक्कम प्रशासकीय खर्चासाठी एमआयडीसीने वापरावी, अशी तरतूद करण्यात येत असल्याचे मसुद्यानुसार स्पष्ट होत आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, हवेली आणि मावळ तालुक्‍यात एमआयडीसी आहेत. याबाबत विधिमंडळात खास विधेयक मांडले जाणार असून “महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि फी नियम सुधारणा विधेयक 2019′ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, “घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचे अधिकार एमआयडीसीला देण्याबाबतचा सरकारचा नवा नियम ग्रामपंचायतींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या निर्णयाला पुणे जिल्हा परिषदेचा विरोध आहे,’ असे स्पष्ट करत, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत भाजप गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी याबाबतचा ठराव मांडला होता. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी सांगितले.

ग्रामपंचायत करवसुलीचे अधिकार एमआयडीसीला देण्याबाबत तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याबाबत 29 ग्रामपंचायतींनी नव्या नियमाला विरोध असल्याचे कळविले आहे. त्याबाबत त्यांनी लेखी आक्षेप नोंदविले आहेत. ते राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत.
– संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प. पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)