शिवसेना नगरसेवकांना देणार 5 कोटींचा निधी
पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी गळ्यात गळे घालून एकत्र आलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पुण्यातही एकत्रित काम केले. या युतीची भेट म्हणून शिवसेनेकडून भाजपकडे महापालिकेच्या काही पदांची मागणी म्हणून सत्तेत वाटा मागण्यात आला होता. मात्र, त्यावर दोन्ही पक्षात एकमत न झाल्याने शिवसेनेच्या पदरात काहीच पडले नाही. त्याची भरपाई करण्याची तयारी भाजपने केली असून शिवसेनेच्या नगरसेवकांना वर्गीकरणाद्वारे प्रत्येकी 3 कोटींचा वाढीव निधी भाजपकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनाही आता भाजप प्रमाणेच अंदाजपत्रकात 2 ऐवजी 3 कोटींचा निधी असणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच हा निधी वर्गीकरणाद्वारे दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी भाजपला आपल्या 100 नगरसेवकांच्या निधीला कात्री लावत शिवसेनेच्या 9 नगरसेवकांना हा निधी द्यावा लागणार आहे.
पालिकेतील सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी शिवसेने भाजपकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, शिवसेनेने मागणी केलेल्या पदांबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊ न शकल्याने विशेष समित्या आणि त्यानंतर प्रभाग समित्यांची अध्यक्षपदेही शिवसेनेला मिळू शकली नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेकांना किमान 9 नगरसेवकांनी महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात ज्या प्रमाणे भाजप नगरसेवकांना 5 कोटींची वॉर्डस्तरीय निधी मिळाला आहे, त्याप्रमाणे निधी दिला जावा, अशी मागणी भाजपकडे केली आहे. सद्यस्थितीला सेनेच्या नगरसेवकांना 2 कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे सेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला 3 कोटींचा निधी द्यावा लागणार आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सेनेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पालिकेतील पदाधिकाऱ्यांना त्यासंबधीच्या सूचना केल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.