पुणे – उड्डाणपूलांच्या ऑडिटचा निकषच नाही; महापालिका प्रशासनाचा खुलासा

पुणे – इंडियन रोड कॉंग्रेस (आय.आर.सी) मध्ये पूल तसेच उड्डाणपुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट किती वर्षांनी करावे याचे कोणतेही निकष नसल्याचा धक्कादायक लेखी खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे केवळ दुर्घटना घडल्यानंतरच पुलांच्या सुरक्षेकडे पालिका लक्ष देणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी मुंबई येथील रेल्वेचा पूल कोसळण्याच्या घटनेपूर्वी पुणे शहरातील पुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित करत प्रशासनाकडून ही माहिती मागविली होती. त्यावर प्रशासनाने हा लेखी खुलासा करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेने या पूर्वी 2013-14 मध्ये नदीवरील 22 उड्डाणपुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले होते.
प्रशासनने दिलेल्या माहितीनुसार, “शहरात नदीवर सुमारे 31 पूल असून 26 उड्डाणपूल आहेत. याशिवाय नवीन मुठा उजव्या कालव्यावर 29 पूल असून शहरातील नाल्यांवर सुमारे 309 पाईप कल्वर्ट तर 170 लहान पूल आहेत. त्याचा नागरिकांकडून नियमित वापर सुरू आहे. त्यानुसार, भानगिरे यांनी शहरांच्या पुलांच्या सुरक्षेसाठी किती वेळ स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले? पुलांची दुरूस्ती करण्यात आली का? ऑडिटचे निकष काय? तसेच किती वर्षांनी ऑडिट आवश्‍यक आहे? याबाबत प्रश्‍न विचारले होते. त्यावर खुलासा करणारा आय.आर.सीच्या निकषांमध्ये केवळ वर्षातून एकदा पुलांची पाहणी करावी, असे नमूद असून स्ट्रक्‍चरल ऑडिट किती दिवसांनी करावे, याबाबत कोणतेही निकष नाही,’ असे सांगण्यात आले आहे.

…तर मग ऑडिट करणारच नाही का?
उड्डाणपूल तसेच पादचारी पूल कोसळण्याच्या राज्यात वारंवार घटना घडत आहेत. यावर प्रशासनाने नियमितपणे सर्व पुलांची तपासणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, केवळ दुर्घटना घडल्यानंतरच त्याकडे लक्ष दिले जात आहे. या शिवाय, काही पूल रेल्वेने उभारलेले असल्याने त्यांच्यांकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट होते किंवा नाही, याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनास दिली जात नाही. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर कोणाला जबाबदार धरणार? तसेच निकष नाहीत, म्हणून उड्डाणपुलांचे ऑडिट महापालिका करणार नाही का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)