पुणे – परवाना नसलेले स्कूल व्हॅनचालक रडारवर

आता झाडाझडती : आरटीओने राबविली होती विशेष नोंदणी मोहीम

पुणे – शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनचालकाला विशेष परवाना देण्यात येतो. यंदा या परवान्यांचे वाटप करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तरी देखील वाहनचालकांनी परवाना घेतला नसल्यास, वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला असून आता विशेष झाडाझडती घेण्यात येणार आहे.

मागील वर्षी कार्यालयाने 4600 वाहनांना परवाना दिला होता. यंदा कार्यालयाने 5113 शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. यामध्ये सुमारे 2100 स्कूल व्हॅनचा समावेश आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनचालकांनी परवाना घेणे आवश्‍यक आहे. परवाना नसल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. मोटार वाहन अधिनियमानुसार मोटार वाहनाच्या कोणत्याही मालकाला अथवा चालकाला शाळेतील मुलांची ने-आण करण्यासाठी परवानगी घेणे आवश्‍यक असते. याबाबत आरटीओकडून देण्यात येणारे योग्यता प्रमाणपत्र प्रत्येक चालकाकडे असणे गरजेचे आहे. आरटीओकडून प्रत्येक वाहनाची आणि चालक-मालकांच्या कागद पत्रांची तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर वाहनाची फिटनेस टेस्ट सुद्धा घेण्यात येते.

“फिटनेस टेस्ट’ नियम
– परवान्यामध्ये समाविष्ट केलेली वाहने आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याऱ्या वाहनांना “पिवळा’ रंग द्यावा.
वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूला “स्कूल बस’ असे लिहिलेले शब्द लिहिणे आवश्‍यक आहे.
– वाहनाच्या खिडकीखाली 150 मिलिमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगविलेला असावा आणि त्यावर शाळेचे नाव लिहावे.
– स्कूल बसवर शाळकरी विद्यार्थ्यांचे चित्र बंधनकारक आहे.
– पुढील दरवाज्याच्या पायऱ्यांसोबर हाताने धरता येणारे कठडे असावेत. कठड्यांची उंची, धातू आणि रचना योग्य असावी.
– आसनामागे, वरती आणि बाजूला हॅन्डल असावे.
– आय.एस.आय. मार्क असलेली अग्निशमन उपकरणे असावीत.
– वाहनचालकाकडे 5 वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव असावा आणि तो परिवहन परवानाधारक असला पाहिजे. स्कूल बस – चालविण्याचा वैध बिल्ला असणे गरजेचे आहे.
– वाहन संपूर्ण स्टील बॉडीसह बंद स्वरुपाचे असावे. कॅनव्हास हूड असणाऱ्या वाहनांना मान्यता देण्यात येणार नाही.
– संकटकालीन दरवाजा किंवा आपत्कालीन परिस्थितीत वाहनाबाहेर पडण्यासाठी खिडकी असावी.
– धोक्‍याचा इशारा देणारी प्रकाशयोजना वाहनामध्ये उपलब्ध असावी. त्याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी.

आपली मुले ज्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनातून ये-जा करतात, त्या वाहनाबाबत जागृत राहणे आवश्‍यक आहे. कोणतीही तडतोड न करता मुलांना विनापरवानाधारक वाहनातून पाठवू नये. पांढऱ्या रंगाची नंबरप्लेट असणाऱ्या वाहनांना कार्यालयाकडून परवाना देण्यात येत नसल्याने पालकांनी पाल्याला केवळ पिवळ्या रंगाची नंबरप्लेट असणाऱ्या वाहनातून पाठवावे. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील शाळेतील विद्यार्थी परिवहन समितीकडे नोंद असलेल्या वाहनातून प्रवास करतात, याची खात्री करावी. विनापरवाना अथवा खासगी वाहनातून विद्यार्थी येत असतील तर त्यांना मज्जाव करावा.
– आनंद पाटील, प्रभारी प्रादेशिक परिवहनअधिकारी, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)