विद्यापीठ अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना

निषेध नोंदवित कारवाईची मागणी : कार्यकारी अभियंता मारहाण प्रकरण

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांच्यावर त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांकडून ऑईल टाकून मारहाण करण्याच्या घटनेने विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवित संबंधितांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, या घटनेमुळे विद्यापीठातील अधिकारी वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे पडसाद गुरुवारी विद्यापीठात उमटले. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील अधिकारी फोरम संघटना व सर्व कर्मचारी संघटनेने दुपारी प्र-कुलगुरू डॉ. एस. एन. उमराणी यांची भेट घेतली. ही घटना गंभीर असून, याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी अधिकारी व कर्मचारी संघटनेने केली. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठ व कर्मचारी यांच्या नेहमीच कामानिमित्त संवाद होत असतो. काही गोष्टींवर मतभेद असू शकतात. मात्र, त्यावरून अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे ही बाब निंदनीय आहे. या घटनेमुळे आता अधिकाऱ्यांपुढे कर्मचाऱ्यांनाही काही सूचना करणेही अवघड बनले आहे. आता कोणत्या भाषेत, कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणे हा मोठा प्रश्‍न अधिकाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी विद्यापीठात याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

पदोन्नतीवरून घटना?

विद्यापीठाच्या स्थावर विभागात दोन कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी पदोन्नती मिळावी, असा हट्ट कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांच्याकडे केला. शासनाकडूनच पदोन्नतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मात्र, तरीही आर. व्ही. पाटील यांनी पदोन्नतीचा पत्रव्यवहार विद्यापीठाच्या प्रशासनाकडे केला. त्यांच्या अखत्यारित ही बाब आहे, असेही पाटील यांनी वेळावेळी सांगितले. तरीही पदोन्नती होत नसल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांनी हे गंभीर कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)